दारुमुळे कॅन्सरचा धोका! उच्च न्यायालयात 24 वर्षीय तरुणाची याचिका, 'सिगारेट, तंबाखू...'

सर्व दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा धोक्याचा इशारा देणारे संदेश छापले जावेत, अशी मागणी यश चिलवार या तरणानं केलीय.   

शिवराज यादव | Updated: Jan 31, 2025, 08:29 PM IST
दारुमुळे कॅन्सरचा धोका! उच्च न्यायालयात 24 वर्षीय तरुणाची याचिका, 'सिगारेट, तंबाखू...' title=

कधी मजेसाठी तर कधी नैराश्य आलं म्हणून दारूचा ग्लास हातात घेतलेले अनेकजण आपण पाहतो. तरूण पिढी यात मागे नाही. मात्र आता याच पिढीचं प्रतिनिधीत्व करणा-या एका 24 वर्षीय तरूणानं दारूच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयात धाव घेतली. या तरुणाचं म्हणणं काय आहे आणि हा तरुण थेट उच्च न्यायालयात का गेलाय.

'दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा द्यावा'

तरूणाची न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

न्यायालयाकडून याचिकेची दखल

भारतात तरूणांचं प्रमाण जास्त आहे. आपली लाईफ दिलखुलास जगायची, हे या नव्या पिढीचं सूत्र.. मग पार्टी, खाणंपिणं आलंच. कधी मौजेसाठी तर कधी काही कारणांमुळे दुखी झालेले दारूचा आधार घेताना दिसतात. अनेकदा पार्टीजमध्ये दारू घेणा-यांमध्ये तरूणतरूणी दिसतात. पण एका 24 वर्षीय यश चिलवार या सजग तरूणानं उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. देशात सध्या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणपिढी दारूच्या आहारी जातेय. सर्व दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा धोक्याचा इशारा देणारे संदेश छापले जावेत, अशी मागणी यश चिलवार या तरणानं केलीय. 

याचिकेत काय म्हटलं आहे?

- सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटांवर कर्करोगाचा इशारा असतो

- त्याप्रमाणेच अल्कोहोलच्या बाटल्यांवर धोक्याचा इशारा द्यावा

- कर्करोगाच्या इशा-यामुळे दारूचं सेवन करणा-यांचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल
 
- जागतिक आरोग्य संघटनेकडून अल्कोहोलला गट 1 सर्वात जास्त धोकादायक म्हणून वर्गीकृत 

- शासकीय पातळीवर अधिक खबरदारी घेण्याची गरज

दरम्यान, या याचिकेची न्यायालयानं दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले. तसंच केंद्रीय अन्न आणि औषध प्रशासन विभाग, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आता हे विभाग आपली काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं.