राज्यात महायुतीचं सरकार आता चांगलच रुळलंय. तिन्ही पक्षात काही विषयावरून वाद सुरू असले तरी संगनमतावर भर देत काम केलं जातंय. त्यातच विरोधी पक्षातून सत्ता पक्षात येणाऱ्या नेत्यांचा ओघही वाढलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनीही आता पक्ष बदलाचे संकेत दिलेत. राजाभाऊ खरे यांनी काय वक्तव्य केलंय, आणि ते कुठल्या पक्षात जाऊ शकतात पाहुयात सविस्तर
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकिटासाठी अनेकांनी कोलांट उड्या मारत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. त्यातीलच एक नाव म्हणजे राजाभाऊ खरे. मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवार गटाला गेल्याने त्यांनी ऐन वेळी शरद पवार गटाची उमेदवारी मिळवली. मोठ्या फरकाने ते निवडूनही आले. पण राज्यात महायुतीची सत्ता आली. स्वताला कट्टर शिवसैनिक म्हणवणारे राजाभाऊ तिकिटासाठी शरद पवार पक्षात गेले असले तरी आता त्यांना स्वगृही परतण्याचे वेध लागलेत.
मोहोळचे आमदार राजाभाऊ खरेंचे पक्षबदलाचे संकेत
नुकत्याच केलेल्या एका भाषणात मी नावाला तुतारीवाला आहे. पण राज्यात सत्ता आपली आहे. ती सत्ता आपल्या माणसासाठी उपयोगात आणायची आहे असं म्हणत त्यांनी सत्तेसोबतच्या जवळीकीचे संकेत दिलेत. आमदार राजाभाऊ खरे यांनी जाहीरपणे सत्तेसोबतच वक्तव्य केलंय. मात्र यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेत्यांनी न बोलणंच पसंत केलंय.
सत्तेत असणं याला अनेक अर्थ आहेत. पुढच्या पाच वर्षांत सत्ता मिळण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळंच सत्तेच्या सावलीला जाऊन विकासनिधी आणि सत्तेचा करिष्मा मिळवण्यासाठी विरोधकांमधील काही आमदार सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सगळ्याच पक्षांकडून तयारी केली जातीये. शिवसेनेकडून मिशन टायगर, भाजपकडून सदस्यता नोंदणी अभियान, त्यातच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचेही प्रयत्न सुरूयेत. सत्ताधा-यांच्या या प्रयत्नांना यशही मिळतंय. आता ढळढळीत असं वक्तव्य करणारे राजाभाऊ कधी सत्तेत सामील होतात, हेचं पाहावं लागेल.