Kolhapur Water Crisis: पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख, मात्र कोल्हापूर शहरवासीयांवर पाणीबाणीची वेळ आलीये. कोट्यवधी खर्च करून पाईप लाईन योजना आणूनही गावात पाणीच पोहोचत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील रहिवाशांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय.
पाणीदार असलेल्या कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरमध्ये दुष्काळग्रस्त भागासारखी परिस्थिती आहे. पाणीदार जिल्हा असलेल्या कोल्हापूरातही पाणीटंचाईचा झळा जाणवू लागलेत. कोल्हापूर शहरात महानगरपालिकेला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलीये. काळम्मावाडी धरणाच्या पाईप लाईन योजनेतील त्रुटींमुळे कोल्हापूर शहरवासीयांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय.
कोल्हापूर शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर असणा-या काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होतो. 488 कोटी खर्च करून धरणातून थेट पाईपलाईन योजना सुरू करण्यात आली.मात्र काही दिवसातच गळती आणि उपसा केंद्रावरील पंपामध्ये बिघाड होण्यास सुरूवात झाली. आणि त्यामुळे मुबलक तर सोडाच पण विना खंडीत पाणीपुरवठाही होत नाही.
मोठा गाजावाजा करत कोल्हापूर महानगरपालिकेने ही पाईपलाईन योजना आणली. 2024 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचं लोकार्पण झालं.मात्र ही योजना राबवताना अनेक तांत्रिक चुका केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.
आतापर्यंत उपसा पंपाची 3 वेळा दुरुस्ती करण्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले.. त्यामुळे किमान आता तरी महानगरपालिकेने या योजनेतील त्रुटी दूर कराव्यात. अन्यथा या योजेनेचे पैसे पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा भावना कोल्हापूरकर व्यक्त करतायत.