World Health Organization: कोरोनाच्या (Corona) धर्तीवर अनेकदा जागतिक आरोग्य संघटनेनं संपूर्ण जगालाच सतर्क केलं आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून नागरिकांना महत्त्वाच्या मुद्द्यांवरून मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उझबेकिस्तानमध्ये (Kids) लहान मुलांसाठी भारतातील नोएडास्थित मॅरियम बायोटेक या कंपनीकडून तयार केल्या जाणाऱ्या कफ सिरपचा वापर केला जाऊ नये. (Marion biotech cough syrup is unsafe says WHO report read details)
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका मेडिकल प्रोडक्ट अलर्टमध्ये WHO नं यासंदर्भातील माहिती दिली. सदरील औषध हे गुणवत्ता निकषांच्या गरजांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरलं असल्यामुळं ते वापरात आणले जाऊ नयेत असा इशारा देण्यात आला आहे.
संकेतस्थळावरून याविषयीची माहिती देत WHO काही गोष्टी अधिक स्पष्ट केल्या. यामध्ये एम्बरोनॉल सिरप (AMBRONOL Syrup) आणि डीओके-1 मॅक्स सिरप (DOK-1 Max Syrup) या दोन्ही औषधांची निर्मिती भारतातील उत्तर प्रदेश (Northern India), नोएडामध्ये (Noida) येणाऱ्या मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (MARION BIOTECH PVT. LTD) या कंपनीकडून करण्यात येते. सदरील कंपनीनं अद्यापही या उत्पादनांविषयीची सुरक्षितता आणि गुणवत्ता या दोन महत्त्वाच्या निकषांबाबत कोणतीही हमी दिलेली नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं अधोरेखित केलं.
उझबेकिस्तानमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर काही लहान मुलांचा मृत्यू ओढावल्याची माहिती समरो आली आणि भारतातील औषध निर्मिती करणाऱ्या या कंपनीचं नाव अडचणीत आलं. उझबेकिस्तानमध्ये सदरील घटनांनंतर या औषधांची चाचणी करण्यात आली, त्यावेळी यामध्ये डायथिलीन ग्लाइकॉल आणि/ किंवा एथिलीन ग्लाइकॉल यांची अस्वीकारार्ह मात्र असल्याची बाब समोर आली.
संयुक्त राष्ट्र आरोग्य संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील औषधांमुळं प्रामुख्यानं लहान मुलांमध्ये गंभीर परिणाम दिसू शकतात. इतकंच नव्हे, तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
आतापर्यंत 18 मुलांचा मृत्यू, एकच खळबळ
22 डिसेंबर रोडी उझबेकिस्तानकडून मॅरियम बायोटेक या कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या औषधामुळं एकूण 18 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. ज्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश प्रशासनाकडून या कंपनीचा उक्पादन परवाना रद्द करण्यात आला.