कराची : Muhammad Khorasani : पाकिस्तानचा जहाल दहशतवादी खालिद बटली अर्थात मोहम्मद खुरासानी याचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानात या खालिदला ठार करण्यात आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील म्होरक्या ठार झाल्याने पाकिस्तानसह दहशतवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. (Most Wanted TTP commander Muhammad Khorasani killed in Afghanistan)
पाकिस्तानचा हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खालिद ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. नंगरहार प्रांतात मोहम्मद खुरासानीचा खात्मा झाल्याचे पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, खालिद याचा मृत्यू कसा झाला याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
खालिद हा पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना तहरिक ए तालिबान पाकिस्तानचा (TTP) प्रमुख म्होरक्या होता. खालिद बटली अर्थात मोहम्मद खुरासानी याचे वय 50 वर्षे होते, अशी माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली. खालीद हा TTPचा प्रवक्ताही होता. त्यामुळे दहशवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानामधील दहशतवादी कारवाईत त्याचा मोठा हात होता. पाकिस्तानी नागरिक आणि सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये खालिद याचा सक्रीय सहभाग होता. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता बंदुकीच्या जोरावर घेतल्यानंतर त्याचे अनेक काबूलचे दौरे केले होते. अशी माहिती पाकिस्तान अधिकाऱ्या हवाल्याने देण्यात आली आहे.