मास्को : Russia Ukraine War : युद्धाच्या 16 व्या दिवशीही युक्रेनवरचे रशियन हल्ले थांबलेले नाहीत. (Russia Ukraine Conflict) युक्रेनच्या डेनिप्रो शहरावर तीन हल्ले झाले. यात बरंच नुकसान झालंय. तसंच या हल्ल्यांमध्ये एका नागरिकाचा मृत्यू ही झाल्याची माहिती आहे. तसेच डोनबास शहरात जोरदार हल्ला चढवला आहे. याची दृश्य कैमऱ्यात कैद झाली आहेत. एका मागून एक अशी अनेक रॉकेट्स डोनबासवर डागण्यात आल्याचे या दृष्यात पाहायला मिळत आहे.
रशियाने यासाठी MLRS अर्थात मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टमचा वापर केलाय. MLRS ही अधुनिक रॉकेट सिस्टम आहे. याचाच वापर करून रशियानं हा हल्ला केला आहे. युद्धाच्या 16 व्या दिवशी रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीपासून केवळ 15 किमी दूर आहे, असा दावा अमेरिकन सैन्यानं केला आहे. सॅटेलाईट छायाचित्रांच्या आधारे अमेरिकाने हा दावा केलाय. रशियन सैन्याचे ताफे वेगवेगळ्या दिशांनी कीव्हच्या दिशेनं चालले आहेत, अशी माहिती अमेरिकेनं दिलीय. गेल्या चोवीस तासांत रशियन सैन्य 3 मैलांचं अंतर कापत कीव्हजवळ पोहोचलंय.
युक्रेनचा झापोरिझ्झ्या न्युक्लिअर प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती रशियन मीडियानं दिली आहे. या प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा केला होता, असा दावा रशियाने केला आहे. युद्धादरम्यान न्युक्लिअर प्लांटवर रशियाने हल्ला केला होता. तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी रशियन मीडिया प्लांट परिसरात पोहोचली आहे.