नातं हे कुठलही असो त्यामध्ये विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. प्रेम आणि विश्वासावर ते नातं मजबूत होतं. पण या नात्यात संशयाचा किडा घुसला की नातं काय अख्ख घर उद्धवस्त होतं. अशाच एका संशयातून एका कुटुंबातील अनेक वर्षांपासून लपलेले सत्य जेव्हा त्यांच्या समोर येतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आपल्या मुलाचा बाप कोण आहे हे एक आईच ठामपणे सांगू शकते. पण विज्ञानाने प्रगती केली आणि डीएनए चाचणीद्वारे हे सत्य जगासमोर येतं. आजकाल डीएनए चाचणी ही खास करु पोलीस प्रशासन एखाद्या व्यक्तीची ओळख पटवून घेण्यासाठी वापरतात. मात्र काही लोक अगदी गंमतीतही ही चाचणी करतात आणि अनेक वेळा त्या चाचणीच्या निकालानंतर त्यांचं आयुष्यात भूकंप येतो.
सध्या सोशल मीडियावर असाच एका घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर एका महिलेने तिच्या आयुष्यातील धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. सासऱ्यांना तिच्यावर संशय होता म्हणून त्यांनी नातवाची डीएनए चाचणी करण्याच ठरवलं. ज्यावेळी त्यांनी नातवाची डीएनए टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट आला तो पाहून त्या व्यक्तीच्या आयुष्यात वादळ आलं. त्यांना स्वत:च्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळलं. मिररच्या रिपोर्टनुसार, महिलेने सांगितलं की, माझ्या सासऱ्यांनी नवऱ्याच्या डोक्यात हे भूत टाकलं की, आमचा मुलगा हा बायकोच्या विवाह बाह्यसंबंधातून जन्माला आला आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलाची डीएनए टेस्ट होत नाही त्यांना मालमत्तेमध्ये त्यांचा वाटा मिळणार नाही. या घटनेनंतर माझ्या सासऱ्यांचं आणि नवऱ्याचा वाद झाला आणि त्यानंतर आम्ही वेगळे राहू लागलो.
महिलेने पुढे सांगितलं की, काही वर्षांनंतर सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून मी सासरी राहायला गेली. त्यावेळी सासऱ्यांनी पुन्हा एकदा डीएनए टेस्टची मागणी केली. यावेळी ते म्हणाले की, मुलासाठी निधी जमा करायचा आहे, तर डीएनए टेस्ट कर. वारंवार डीएनए टेस्टची मागणी होत असल्याने मी माझ्या नवऱ्याशी बोलली आणि हा विषय कायमचा बंद करण्यासाठी आम्ही दोघांनी डीएनए टेस्ट करण्यासाठी परवानगी दिली. पण पुढे जे झालं त्यानंतर आमच्या आयुष्यात वादळ आलं. या टेस्टमधून असं समोर आलं की, मुलगा हा माझ्या पतीपासूनच झाला आहे. पण ते मूल अनेक पितृक नातेवाईकांशी रिलेट होत नव्हतं. म्हणून माझ्या सासऱ्यांचा माझ्यावरील संशय अजून बळावला.
महिलेने स्पष्ट केलं की, तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनंतर आणखी एक डीएनए चाचणी करण्याचा त्यांनी ठरवलं. यावेळी सासरे आणि माझ्या नवऱ्याची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यात असं सिद्ध झालं की, माझ्या सासूचं विवाहबाह्य संबंध होते आणि माझ्या नवऱ्या त्या अफेयरमधून जन्माला आला होता. यानंतर सासरे पुरते हादरुन गेले आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला.