मैत्रीणीच्या Pre Mature मुलीला स्तनपान करत तिने निभावलं मैत्रीचं नातं......

हीच ती आधुनिक काळातील यशोदा..... 

Updated: Jan 20, 2020, 06:09 PM IST
मैत्रीणीच्या Pre Mature मुलीला स्तनपान करत तिने निभावलं मैत्रीचं नातं...... title=

दक्षता ठसाळे-घोसाळकर, झी मीडिया, मुंबई :  आईचं तिच्या बाळाशी असणारं नातं हे काही शब्दांमध्ये मांडता येणं तसं कठीणच. ममता, माया अशी अनेक रुपं असणाऱ्या याच मातृत्त्वाचं नातं हे बाळ आणि आईला जोडणारी नाळ ठरवत नसते. तर, हे नातं मनाचे बंध आणि नात्यांना जोडणारी आपलेपणाची नाळही ठरवत असते. पुरातन काळापासून, आपण यशोदा आणि देवकीच्या गोष्टी एकत आलो आहोत. कृष्णाला जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा त्याचं संगोपन करणारी यशोदाच कायम महत्त्वाची वाटली. असा यशोदा आणि देवकीचा अचानक संदर्भ लावला जाण्याचं कारण ठरत आहे, बदलता काळ आणि याच काळातील आधुनिक यशोदा आणि देवकी.

खरंतर हे चित्र फार दुर्मिळ असलं तरीही ते सध्या पाहायला मिळत आहे. हे चित्र जणू म्हणजे एक कथाच. दोन मैत्रिणी अगदी जिवाभावाच्या... कॉलेजमध्ये झालेली ओळख पुढे तशीच कायम राहिली. पण मैत्री पुढे अशा रुपात समोर येईल असं एकमेकींना कधीच वाटलं नव्हतं. नेहा सिंह आणि अक्षता शेट्टी एकमेकींच्या जिवश्च कंठश्च मैत्रिणी. पण या मैत्रीचं रुपांतर पुढे एका वेगळ्या नात्यातून समोर आलं.



गरोदर असणाऱ्या नेहा सिंहने सहाव्या महिन्यातच नैसर्गिकरित्या मुलीला जन्म दिला. सहाव्या महिन्यातच 'प्री-मॅच्युअर' जन्माला आलेल्या मुलीचं 'मेहर' असं या नाव ठेवून बाळाला वाढवण्याचा निर्णय सिंह कुटुंबीयांनी घेतला. बाळ जन्माला आलं पण नेहाची आई म्हणून पूर्ण वाढ न झाल्यामुळे तिच्या स्तनांमध्ये दूध येत नव्हतं. अशावेळी त्या बाळासाठी धावून आली तिच्या आईची जवळची मैत्रीण अक्षता शेट्टी.



याचदरम्यान अक्षताने एका मुलीला 'इयाना'ला जन्म दिला होता. अशावेळी मेहरला अक्षताने दूध देण्याचा निर्णय घेतला. सहाव्या महिन्यातच जन्माला आलेल्या मेहरवर डॉक्टर सर्वतोपरी उपचार करत होते. पण आईचं दूध हे बाळासाठी कायमच अमृतासमान असतं. हेच दूध अक्षताने मेहरला देण्याचा निर्णय घेतला. रूग्णालयातून 50 मिली दूधाकरता 1800 रुपये आकारले जाणार होते. अशावेळी अक्षताने घेतलेला निर्णय हा खरंच धैर्याचा होता.



जवळपास महिनाभर अक्षताने मेहरला दूध दिलं. शय आणि इयाना अशी दोन मुलं घरी असल्यामुळे अक्षताला हॉस्पिटलला जाऊन दूध देणं शक्य नव्हतं. अशा वेळी Ease my Life या ऍपच्या माध्यमातून दूध देण्याची सोय करण्यात आली.



4 जानेवारी ही नेहाची प्रसूतीची तारीख होती पण 27 सप्टेंबरलाच नेहाने मेहरला जन्म दिला. अवघ्या सहा महिन्याच्या मेहरने असंख्य वेदना सहन करत 65 दिवस रूग्णालयात काढले. जन्मतःच परिस्थितीशी झुंजणारी मेहर लवकरच चार महिन्यांची होईल. तिच्या या चार महिन्यांच्या काळात प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. यामध्ये अक्षताचा महत्वाचा वाटा आहे.

याकाळात अक्षता काही कामानिमित्त बाहेर गेली होती. अशावेळी मेहरला दूध मिळावं याकरता तिने सोशल मीडियावर नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांशी संपर्क साधला. यावेळी मेहरकरता नुकतीच प्रसूती झालेल्या मातांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अनेक माता घरी येऊन मेहरकरता दूध देत होत्या तर अनेक महिलांनी ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन मेहरला दूध पाजलं. 'आताच्या धावपळीच्या जगात कुणी कुणासाठी काहीच करत नाही अशी बोंब होत असताना माझ्या मेहरासाठी असंख्य आया धावून आल्या. यावरून माणुसकीवरचा विश्वास आणखी दृढ झाल्याचं, मेहरची आई नेहा सांगते. तसेच मेहरही माझी मुलगी असली तरीही अक्षताच तिची पहिली आई असल्याची भावना नेहा शेअर करते.

धकाधकीच्या जीवनात आपल्या जीवनात समतोल राखण्यासोबतच फक्त स्टेटसमध्ये फोटो अपलोड करण्यापुरता आणि नावापुरताच मैत्रीचं नातं सीमीत न ठेवता नेहा आणि अक्षता या दोघींनीही मातृत्त्व आणि मैत्री अशा दोन नि:स्वार्थ नात्यांची एक वेगळी आणि तितकीच आदर्श प्रस्थापित करेल अशी बाजू समाजापुढे ठेवली आहे.

आज 'मेहर'ची ही गोष्ट शेअर करण्यामागचा मुख्य उद्देश अशा गोष्टीची जागृकता करणं. मेहर सारख्या असंख्य बाळांना आईच्या दुधाची गरज असते. अशावेळी दुध बँक मार्फत आपण बाळांची गरज भागवू शकतो. तसेच अनेक माता काही कारणास्तव जन्मतः आपल्या बाळांना गमावतात अशावेळी आपलं बाळ गमावलेल्या आई पुढे येऊन दूध बँकेमार्फत अनेक मुलांची त्यावेळेची गरज भागवू शकते.