(लेखक व्यवसायाने ग्राफीक डिझायनर आहेत... त्यांच्या https://unadbhatkantee.blogspot.com/ या ब्लॉग लेखनासाठी 'गिरिमित्र' संस्थेतर्फे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय... या ब्लॉगच्या निमित्तानं ओळख एका नव्या लेखकाची)
देवा घाणेकर, पुणे : हा सह्याद्री, कधी सोनकीच्या बहरलेल्या फुलांनी सजतो तर कधी आसमंती भिडलेल्या कड्या कपाऱ्यानी रौद्र भासतो. त्याच्या सह्यखुषीत आजवर कित्येक गावे - वाड्या सुखाने राहताहेत. त्यात नांदणारी माणसं आज सह्याद्रीच्या उंचीइतकीच माया जपून आहेत. ह्या घराघरात आजही माणुसकीचा झरा अविरत खळखळत आहे.
ऐन उन्हाळ्यात मे महिन्याची २७ तारीख, इकडे तापमान नोंदीचे नवनवे विक्रम होत असताना आम्ही मात्र निघालो होतो त्याच वैशाखी वणव्यात भाजून निघालेल्या जुन्या वाटा धुंडाळायला, रांगड्या सह्याद्रीच्या खुशीत चढाई उतराई करायला. दरवेळेस सह्याद्री साथ करतो तो ह्यावेळेसही बिनदक्त मदत करणार ही खात्री होती. पुण्यातून सर्वांना घेऊन निघालो तेव्हापासून गाडीत डुलक्याच टाकत होतो. मध्ये कधीतरी वाई मध्ये सचिन थिटे गाडीत बसले तेव्हा थोडी जाग आलेली. मग थेट महाबळेश्वरच्या एका काटकोनातल्या वळणावर ड्रायव्हरच्या अंगात 'मायकल शुमाकर' घुसला आणि जी काही गाडी वळवली की मी माझ्या सीटवरून अलगद बाजूच्या सीटवर जाऊन बसलो.
आता मात्र झोप उडाली. गाडी पोलादपूर रस्त्याने रामवरदायिनी पार फाट्यावरच्या कमानी मधून आत घुसली आणि किर्रर्र रानात गाडीच्या मोठ्या उजेडासोबत तिचा घरघरणारा आवाज तिथल्या भयाण शांततेला चिरत गेला. आखूड आणि जाग्यावर वळणं असलेल्या रस्त्यावर गाडी हाकताना ड्रायव्हर थोडा वैतागला होता. गाडी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ३०० वर्षांपूर्वीचा जुन्यापुलावरून गेली तेव्हा किर्रर्र अंधार होता. मागच्याच आठवड्यात ह्या पुलाखाली उतरून पाहिले होते. महाबळेश्वर ते हातलोट ३० किमीचे अंतर कापण्याचे काम ड्रायव्हर सुधाकरने चोख बजावले.
सकाळी ३ च्या ठोक्यावर हातलोट गावात आलो तेव्हा मधुमकरंदगड चंद्रकोरीच्या उजेडात न्हाऊन निघाला होता. कुंबालजयदेवीच्या मंदिरात पाठ टेकवली कधी ते कळायच्या आत साडे पाच वाजलेत हे सांगण्यासाठी भ्रमणध्वनी कानाजवळ गुणगुणला. त्याची आज्ञा मानीत उठून बसलो. देवीचे पुजारी मंदिर झाडलोट मध्ये गुंतले होते. त्यांच्या सेवेत भंग पाडून चंद्रकांत मोरे ह्यांचे घर विचारून घेतले. वाटाड्या सोबत असल्याने वेळेची बरीच बचत होणार होती. त्यांच्या घरी कारभारणीने चहा आणून दिला. त्याचा डोस घेत घराच्या मागून चढाईस भिडलो. सकाळचे ७ वाजले...
वाटेवर असंख्य वृक्षराजीने सावली धरलेली. सूर्याची कोवळी किरणं आत घुसण्यास धजावत नव्हती. तरी पहिल्याच चढाईत घामाच्या बादल्या भरल्या. मागच्या आठवड्यात रडतोंडी घाटातून जेव्हा मधुमकरंद गडाला पाहिले तेव्हा खरोखरच घोड्याच्या खोगीरासारखा दिसत होता. त्याच्या आकारावरून ह्याला सॅडल बॅक म्हणतात. जावळीच्या घनदाट जंगलात उठावदार उंचीमुळे हा विशेष भाव खाऊन जातो. दीड तासाच्या खड्या चढाईनंतर घोणसपूरच्या पदरात आलो. प्रशस्त शिवायलात थांबा घेतला. स्वयंभू शिवलिंग आणि काही मूर्ती ह्यांनी परिसर घनदाट अरण्यांनी निसर्गमय झालेला.
मंदिराकडे पाहत असू तर डाव्या बाजूने एक प्रशस्त वाट थेट गडावर गेली. एका पूर्णपणे ढासळलेल्या दरवाज्यातून गडावर आलो. येथून थेट चढाई न करता आधी पाण्याची टाकी पाहून घेऊ म्हणून सरळ वाटेने पुढे गेलो. वाट डाव्या बाजूला फिरली आणि पुढे हातलोट गावाचे विहंगम दृश्य दिसले. खडकात खोदलेल्या टाक्यांपाशी तृप्त झालो.१२ खांबावर तोललेले टाके असले तरी दर्शनीभागातले तीनच खांब दिसत होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नव्हता. ह्याला 'रक्तटाके' असेही म्हणतात. (टाक्याबाहेर लावलेल्या बोर्डवरून) गडावर एकूण ७ टाकी. (वेळेअभावी आम्ही हे एकच पहिले) तेथून थोडस मागे आल्यावर सरळ वर चढत जाणारऱ्या चिंचोळ्या पायऱ्यांनी दम काढला. मल्लिकार्जुन शंकराच्या पुरातन मंदिरापाशी आलो. (उंची १२३६ मी) मंदिरात जाण्याआधी सरळ गेलेल्या सोंडेवर कसरत करीत अखेरपर्यंत जाऊन आलो. सध्या आम्ही मकरंदगडावर उभे होतो. ह्या जोडीतला मधुगड समोर होता. तो अवघड चढाईने अशक्य बनलेला. त्यामुळे इथूनच सभोवतालचा नजारा पाहून काढता पाय घेतला आणि मंदिरात आलो. मंदिरातील शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष शिवरायांनी केली असे सांगितले जाते. (संदर्भ: गडकोट -भगवान चिले सर) शिवलिंगावर तांब्याचा नाग आणि मागे मल्लिकार्जुनाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रत्येक शिवालयासमोर असणारा नंदी येथेही आहे. प्रतापगडासोबतच १६५६ मध्ये बांधला असावा. लढाऊ किल्ला म्हणून याचे स्थान नसल्याने इतिहासकाळात येथे मोठ्या लढाया झाल्याच्या नोंदी नाहीत. पुढे १४ मे १८१८ मध्ये इंग्रजांनी जिंकला.
फार वेळ वाया न घालविता गड सोडला. खाली पुन्हा मंदिरात आलो. क्षणिक विश्रांतीसह घोणसपुर डाव्या हाताला ठेवत गडाला वळसा घेतला. हातलोटगावातून मधुमकरंदगड अगदी विक्रमी वेळेत संपवलेला. घोणसपुर डावीकडच्या बगलेत ठेवून धनगरवाड्यात आलो. चेंढरी मेंढरी पोरा कौतुकानं एकेकाला न्याहाळत होती. विजयने आंबे आणि काही खाऊ हातावर ठेवून त्यांच्या गोड हास्यासह पुढे सरकला. उजवीकडचा मधूमकरंदगडाचा कडा भव्य दिसत होता. काही वेळापूर्वी आपण त्या टोकावर होतो ह्याचा विश्वात बसत नव्हता. पावसाळी धुंद वातावरणाच्या सुरवातीचा नजाऱ्याने सुखावून गेलो. धुक्यांनी मधूगडाला विळखा घातलेला. मौसम मस्ताना झालेला, ह्याचा फायदा उचलण्यासाठी मी सर्वांना भराभर चालण्याचा तगादा लावला.
रौद्र कोंडनाळेच्या मुखाशी आलो तेव्हा सकाळचे १० वाजले असतील. आज कोंडनाळ उतरून पुन्हा हातलोट घाटाने वर हातलोट गावात यायचं होतं. नाळ उतरायचे ४ तास आणि घाट चढाई दोन ते अडीच तास, टंगळ मंगळ चे एक - दोन तास पकडले तरी संध्याकाळी ७ च्या आत हातलोट गाठू असे साधेसुधे नियोजन होते. पहिल्याच अरुंद आणि घसरगुंडीच्या पॅचने धाबे दणादले. सावध उतराई चालू केली. पहिल्या दहा मिनिटांचा झाडीतला घसारा पार केला आणि मग नाळेने आपले खरे रंगरूप दाखवायला सुरवात केली.
दोघांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन चालायला लागत होते. पुढ्यात साऱ्या धोंड्यांचा उघडा संसार सांडलेला. कुठून एखादी धोंड पायाखालून सरकायची आणि हृदयाच्या वाढत्या ठोक्याबरोबर त्याचा दणाणणारा आवाज नाळेत घुमायचा. पाण्याच्या प्रवाहाने कोणताच दगड नीट बसलेला नव्हता. एखाद्यावर मोठ्या विश्वासाने पाय ठेवला तर तो घातकी निघायचा. गणेशला त्याचा एकदा प्रसाद मिळाला. समोरचे बेलाग कडे सह्याद्रीच्या रांगडेपणाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी सरसावलेले. नाकासमोर उतरणारी नाळ आता डावीकडे काटकोनात वळली आणि समोर अजून किती नाळ आहे, ह्याचा अंदाज आला. हळूहळू तापणारा नारायण माथ्यावर आला. उन्ह चढू लागली तशी दगड धोंडी तापायला लागली. भरीत भर म्हणून आम्ही कोकणात उतरत असल्याने हवेतला दमटपणा जाणवू लागलेला. अगदी एखादीच हवेची झुळूक सुखावून जात होती. पण ती पुरेशी नव्हती. एखाद औषधाला मिळावं तसं एखाद झाड सावली धरून होतं.
इथं खरा खेळ सुरु झाला. मागच्या भिडूनं अक्षरशः कात टाकली. पुढचे एक पाऊल टाकताना हजार वेळा विचार करायला लागले. दहा मिनिटे उतरलो की त्यांची वाट पाहत पाऊण तास थांबायला लागत होते. मागच्या भिडूंना बोंबलून अक्षरशा घसा कोरडा पडायला लागला. एका ठिकाणी भेटून कुठंतरी चार घास पोटात ढकलू पण मागे राहिलेले भिडू पुढे येईनाच. पुढे आलेल्या टीमला गाठले. एका दगडावर बसून त्यांची वाट पाहू लागलो. उगाच मनाचे समाधान म्हणून मी एकेकाला धीर देत होतो.
मी : आता काय किल्ला चढलोय. थोडसच राहिलंय!
गणेश : हो पण अजून दरवाजा उघडायचाय, किल्ला लढायचाय आणि मग जिंकायचाय सुद्धा
अमरदीप : आताची परिस्थिती बघता जिंकतो कसला, इतकं थकलोय की आता उलट वर गेलो तर वर असणाऱ्यालाच म्हणायचं, मलाच मार!
मग समोरचा म्हणेल : अरे पण तलवार नाहीय...
ही घे माझ्याकडची तलवार पण मला मार!
ह्या वाक्यावर असला फुटलो की हास्याने सारी नाळ दाणादूण गेली.
घडाळ्याच्या काटा भरभर सरकू लागला पण पायाखालची वाट संपेना आणि मागचे भिडू काही पुढे यायचे नाव दिसेना. आता नाळ भयंकर तापलेली. दुपारचे २ वाजून गेलेले. माझा बधिर झालेला मेंदू वेळेचे गणित मांडण्यात गांगरून जात होता. सारखा प्लॅन बदलून डोक्याचा भुंगा झालेला, थोड्या वेळापूर्वी कोणता प्लान फायनल केला तो आठवेना. कोणता घाट कोणत्या सीजन मध्ये चढायचा आणि कोणता उतरायचा ह्यात जर गडबड केलीत तर निष्कारण हाल ओढवून घेणार ह्यात शंका नाही.
विजय आणि मी मागे राहिलेल्या दोघांना आणण्यात गुंतलो होतो, एक टीम भरभर पुढे चालत होती. त्यांना पुढे जावू दिले. मागच्यांना विनवण्या करून आणि ओरडून आम्ही थकलो होतो. अखेर वैतागून पुढे जाऊन एका ठिकाणी थांबू म्हणून मी आणि विजय नाळ सोडून जंगलात घुसलो. त्या अक्राळविक्राळ काटेरी झाडोऱ्यात शरीराची फारशी तमा न बाळगता जोरदार उतरलो. ह्या नादात झुडपांचा पाला आणि कसपटे कुठे कुठे घुसले त्याचा पत्ता लागला नाही, असंख्य चिकनखडे अंगाला चिपकले. पायाखालच्या कुरकुरणाऱ्या आवाजाने उगाच घाबरवले. वाराही मूग गिळून बसलेला. पाच पाच मिनिटांच्या थांब्याने नक्की किती उतरलोय ह्याचा अंदाज येईना.
एका ठिकाणी पुढे आलेल्या टीमला गाठले. संध्याकाळचे ४ वाजले होते. प्लान पुन्हा बदलला होता. आता सर्वच्या सर्व बिरमणी गाठू, जेथून ड्रायव्हरला फोन लागेल तेथून त्याच्याशी संपर्क करायचा आणि गाडी बिरमणीमध्ये बोलावून पुणे गाठू. वाटाड्याला हातलोटला पाठवून द्यायचे आणि जर इकडून फोन नाहीच लागला तर वाटाड्या मोरे मामा ड्रायव्हरला निरोप देतील. मुख्य प्रश्न असा होता की हातलोट ते बिरमणी बाय रोड १०७ किमी होते. ड्रायव्हर नक्की कुरकुर करणार. पण पर्याय नव्हताच.
मागच्या दोघांची वाट बघण्यासाठी विजयला सोबत ठेवले आणि अमरदीपकडे जबाबदारी देऊन बाकी सर्वांना पुढे जाण्यास सांगितले. मागे राहिलेल्या भिडूंची मी आणि विजय तिथेच वाट बघत थांबलो. एक चांगला दगड बघून आडवा पडलो. चांगला तासभर झोपलो तरी काही हे आले नाहीत. दरम्यान दगडावरून घामाचा एक ओव्हळ नाळेत उतरला होता. आता काळजी वाटू लागली. उठलो आणि थेट नाळ चढायला सुरवात केली. दोन तीन मोठमोठाले दगड चढून गेलो आणि एक भिडू हताश दगडावर बसलेला दिसला. मागचा कुठेय अशी चौकशी केली तर तो अजून मागे आहे असं कळलं! कधी नव्हे तो थोडासा चरकलोच! विजय ने मागून मीठ आणि पाणी आणून दिले. ते घेऊन भरभर वर चढू लागलो, चढताना असंख्य वाईट विचार मनात येऊन गेले. का करतो आपण हे सर्व, आपल्या आनंदासाठी एखाद्याचा जीव धोक्यात घालतो का?
अश्या असंख्य प्रश्नांचे काहूर माजले. उत्तरे आतातरी माझ्याकडं नव्हती.
एका दगडाच्या कानोशाला टेकून बसला होता. मीठ टाकून पाणी दिले. थोडी तरतरी आली. धीर देऊन एक एक पाऊल टाकू लागला. नाळ सोडून पुन्हा त्याच जंगलात घुसलो, पुन्हा काट्यांनी ओरबाडलं पण तमा नव्हती. त्याला वाट मोकळी करून देत देत हळूहळू खाली आणले.
आता नाळेत घुसतच नव्हतो, नाळ जेवढी टाळता येईल तेवढी टाळत होतो. नाळेत उतरलो की पुन्हा वेळ वाया जाणार. सहा वाजायला आलेले. बऱ्यापैकी उजेड होता ही जमेची बाजू. एकदा नाळेत उतरून पुन्हा जंगलात घुसलो. आता पुसटशी मळलेली वाट सापडली. उठत बसत चाल चालू ठेवली. अजून किती बाकी आहे ... ह्याचा अखंड हरिनाम सप्ताह चालू होता... हे काय आले गाव, झालेच , पोहचलो गावात अशी असंख्य उत्तरे देताना तारांबळ उडत होती, त्याला पण नक्की माहिती असेल की ठोकाठोकीची उत्तरे आहेत, पण चालण्याशिवाय पर्याय नव्हता. अंधार होतोय, जावळीच जंगल रात्रीचे चांगलं नाही, अनेक प्राणी बाहेर येतात अशी घाबरवणारी वाक्ये पण बोलून झाली.
साडे सहाच्या दरम्यान पुढे आलेली टीम भेटली आणि हायसे वाटले. हातलोट घाटाच्या ओढ्यात ते उताणे पडलेले. तेथूनच हातलोट गावासाठी वर जाणारी वाट होती. अमरदीप ने आधीच दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. एक म्हणजे वाटाड्या मोरे मामांना त्यांनी घाटाने वर जाण्यास सांगितले, सुरवातीचा ‘ना’ सूर मग परिस्थिती पाहून त्यांनी फारसे आढेओढे घेतले नव्हते. त्यांची बिदागी देवून ड्रायव्हरला द्यायच्या निरोपासह हातलोट घाटाची वाट पकडली होती. दुसरा निर्णय घेतला तो म्हणजे क्रांतिवीर आणि प्रभूराज ह्या नव्या दमाच्या भिडूंना गावात पिटाळले, त्यांना दोन कामे लावली. एक ड्रायव्हरला फोन लावणे आणि दुसरे जर आम्ही ९ पर्यंत नाही आलो तर गावकरी घेऊन येणे .
गावात जाऊन ह्यांनी काय केलंय ह्याची धास्ती राहिली. जोरदार पावले उचलली. काळभैरव मंदिराजवळून पुढे गावात पोहचलो. ७ वाजले होते. अंधार पडला होता.
आमची दोन पोरं दिसली का हो?
हो हो दिसली... फणस खाऊन गेले...!
हायला ह्यांना पुढे कामाला पाठवले की फणस खायला...
गावात हनुमान मंदिराजवळ आलो आणि तिथे असणाऱ्या गावकऱ्यांकडे चौकशी केली. एक आजी सांगत आली की, त्यांनी निरोप ठेवलाय की ते गाडीवाले येत नाहीय इकडे, त्याला आणायला ते खेडला गेलेत. हा प्रोब्लेम होणार होता हे मला माहिती होते. तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो. एक गावकरी त्याची गाडी घेऊन आम्हाला खेडला सोडायला तयार झाला. पण हे आधीचे गाडी घेऊन आले तर पुन्हा प्रॉब्लेम. गावात रेंज नव्हती. एका ठिकाणी रेंज येते ती जागा दाखवायला चार गावकरी सोबत आले. एका दगडावर चढायचे आणि मोबाईलचा हात उंच धरायचा. पहिले दोन तीन प्रयत्न फेल गेले. लहानपणी गावात दूरदूर्शनचा अँटिना जसा फिरवायचो आणि म्हणायचो ना... आला आला... गेला गेला... तसं आता नेटवर्कसाठी धडपडत होतो.
बराच वेळ निष्फळ प्रयत्न झाले. अखेर थकून खाली बसलो. खाली बसलो आणि रेंज आली. संपर्क झाला. जेव्हा फोन झाला तेव्हा गाडीचा स्टेट्स सांगायच्या आधी क्रांतिवीरने ज्या ड्रायव्हरला शिव्यांच्या लाखोळ्या वाहिल्या त्या आधी सांगितल्या. मी आणि अमर बेक्कार हसत होतो.
ड्रायव्हर यायला तयार झाला होता. एक अंदाज बांधला... गाडी पोलादपूर - कशेडी घाट - भरणे नका करून पुढे बिरमणीला १०७ किमी येणार म्हणजे ३ तास हमखास खाणार. दहा सव्वा दहा पर्यंत काय गाडी येत नाही. आता वाट पाहणे एवढच बाकी होतं. गाववाल्यांनी आल्यापासून आत्तापर्यंत ४ वेळा जेवणासाठी विचारले होते. आमच्यामुळे उगाच त्यांना त्रास म्हणून त्यांना प्रेमाने नकार कळविला होता. मंदिरात शरीराला आराम देण्याचे ठरवलं आणि पुन्हा गावात आलो. फ्रेश झालो. अंडी होती दुपारसाठी आणलेली ती राहिलेली तशीच ती खाऊन घेतली, भूक केव्हाच मेलेली. एक दोन वाटेत आंबे भेटले ते हावरटासारखे खाल्ले. तोंड धुवून थोडा फ्रेश झालो आणि मंदिरात अंथरलेल्या ताडपत्रीवर आडवा झालो. एका पाठोपाठ एक सर्वच आडवे झाले. एक दोन जागे असलेले गप्पा मारत बसले.
साडे नऊ झाले असतील आणि गावातील एक लहान मुलगी आणि तिच्या आईला राहवले नाही आणि ती पुन्हा आमच्या जेवणाविषयी विचारायला आली. सर्वांच्या वतीने विजय पुन्हा नकार देत होता पण त्या मायलेकी काय ऐकायला तयारच होईनात. अर्धी अर्धी भाकरी तरी खाऊन घ्या म्हणजे आम्हाला बरे वाटेल. एवढं सांगून त्या मायलेकी पुढच्या तयारीसाठी घरी निघून गेल्या. त्यांचा आग्रह आता मोडणे केवळ अशक्यच झालेले...
दहा वाजता गाडी आली. इकडे लेकीने जेवण सुद्धा आणले. हंडा - कळशी पाणी आणले. ताटात एकदम कोकणी मेनू... केळीच्या पानात तांदळाच्या भाकऱ्या, भात, डाळ, भाजी, वडे अशी पंचपक्वान्न समोर आली. जेवण सुरु झालं. आईशपथ मी आयुष्यात पहिल्यांदाच भेंडीची भाजी खाल्ली. ताटातलं काही संपतंय का ह्यावर तिथल्या गावकरी मोहन मोरें आणि त्यांच्या भावाची नजर. तेथूनच अगं हे आन - ते आन गं!
आम्ही नको नको म्हणताना पुरे... वरून पिशवी भरून आंबे आणले. जेवणांनंतर खा, हा आग्रह! काय संस्कार असतील ह्या मातीचे.... सह्याद्रीने आपल्या कुशीत काय माणसांना जन्म दिलाय राव...! हेवा वाटावा असं आतिथ्य, आपलेपणा, परोपकार, आणि प्रामाणिकपणा...याहूनही अजून काही!
जेवण वाढणाऱ्या त्या काकू आता आई आणि ती मुलगी आता लहान बहीण वाटू लागली. सगळं भावनिक वातावरण तयार झालं होतं. तल्लिनतेने जेवणं आटोपली. बाहेर येऊन हात धुतले. आता पुन्हा आंब्याची पेटी आली... सर्वांनी न्या असे आवर्जून सांगितले. आमची तर बोलती बंद झालेली. कुठलं आतिथ्य अनुभवत होतो आम्ही..? सह्यकुशीत काय संस्कार पेरुन ठेवलेत या सह्याद्रीने... आम्हा शहरीबाबूंची नशा कधीचं उतरलेली होती. कोकणी पाहुणचारा समोर नतमस्तक झालो. परतफेडीसाठी आता आम्ही श्रीमंत नव्हतो. मंदिरातले सामान पाटीवर लटकवीत जड अंतःकरणाने निरोप घेतला. सुखी अनुभवांच गाठोड काखेत बाळगुन बिरमणी सोडले तेव्हा डोळे पाणावलेले होते.
ठरवलेल्या काही गोष्टी ह्या भटकंतीत झाल्या नसल्या तरी तरी एक आतिथ्यशील ह्रदयस्पर्शी अनुभव आमच्या अंतर्मनात कायमचा कोरला गेला होता. आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेन आणि पुन्हा नव्याने जगेन...
उत्तम कालावधी : पावसाळ्यानंतर कधीही.
ट्रेक दिनांक : २७ मे २०१८ ( हा ट्रेक सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंत कधीही करावा.)
ट्रेक : हातलोट गाव : मधुमकरंदगड - कोंडनाळ - बिरमणी
लागलेला वेळ : दोन भिडू थकल्यामुळे आम्हाला नाळेत ७ तास लागले. पण हातलोट ते मकरंदगड २ तास, कोंडनाळ ४ तास उतराई
अंतर : संपूर्ण चाल : १६ किमी भरली असे जीपीएस यंत्रणेने दाखवले. (नाळ १० किमी)
उंची : हातलोट: ६५१ मी. मकरंदगड : १२३६ मी, कोंडनाळ: ८९० मी, बिरमणी: १४५ मी.
पाण्याची व्यवस्था : हातलोट नंतर मधुमकरंद गडावर अंडी शेवट घोणसपूरला. त्यानंतर नाळेत पाणी नाही. (जानेवारी नंतर)
खर्च : रु. १२००/- प्रत्येकी
कसे जाल : महाबळेश्वर - हातलोट
हे चुकवू नका : मकरंदगडावरील पाण्याचे टाके
अडचणी : उन्हाळयात कोंडनाळ शक्यतो टाळावी. केलीच तर सकाळी लवकर उरकावी. त्यासाठी मकरंदगडाचा मोह टाळावा
थोडक्यात महत्त्वाचं : हा ट्रेक कसलेल्या दुर्गयात्रींसाठी आहे. प्रचंड मानसिक आणि शारीरिक क्षमता असणाऱ्यांनी ही वाट पाहावी. सहनशक्तीचा अंत पाहणारी नाळ आहे. नाळ उतरत असाल तर घुडग्यांना नीकॅप असावी, उतरताना घुडग्यांवर ताण येतो. ट्रेक भिडू संख्या कमीत कमी असावी आणि आपल्या ओळखीचे भिडू असावे. त्यांच्या क्षमतेवर लीडरचा विश्वास असायला हवा. उगाच भावनिकतेने ह्या नाळेच्या नादी लागू नये
वाटाड्या : मुरलेले ट्रेकर असाल तर फारशी गरज नाही, बाकी वाट मळलेली आहे. (जावळी खोऱ्यात घुसताना अभ्यास मजबूत हवा)
सहभागी भिडू : गणेश कुंदापूरकर, विजय गुजर, सचिन थिटे (ओ पॉझिटिव्ह), श्रीहरी कुलकर्णी, पूजा साळवी, क्रांतिवीर, प्रभुराज, अभिषेक मुळे, अमरदीप सलगर आणि देवा घाणेकर