सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : इंटरनेटच्या काळात ट्रोलिंग नवं नाही. कोरोना काळात तर त्याची प्रकर्षानं जाणीव झाली. कधीकधी फक्त गंमत म्हणून ट्रोलिंग केलं जातं. तर कधीकधी त्याला प्रखर विरोधाची धारही असते. गम्मत म्हणून ट्रोल करणा-यांची एक जमात तर त्वेषानं, रागानं ट्रोल करणा-यांची दुसरी जमात... गम्मत म्हणून ट्रोल करणा-यांना सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवायचे असतात. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे सेलिब्रिटींना ट्रोल करणं.
सेलिब्रिटींनी कुठल्या मुद्दावर मत नोंदवलं की ही जमात ट्रोल करणारच. मग त्यांच्या मागे आपलेही फॉलोअर्स वाढावे म्हणून रांग असतेच, तेही या ट्रोलिंगमध्ये सहभागी होतात. सेलीब्रिटींना हे ट्रोलिंग नवं नाही. खरंतर आपण जितकं चर्चेत राहू तितकं चांगलंच...बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ... हे सेलिब्रिटींचं धोरण. त्यामुळे कधीकधी सेलिब्रिटीही या ट्रोलिंगमध्ये आनंद मानतात.यामुळे ट्रोलर्सचं फावतं.
आपण वाट्टेल त्या भाषेत बोलतो तरी आपलं कुणी वाकडं करु शकत नाही, त्यामुळे लगे रहो, असा त्यांचा विचार. दिवसागणिक भाषेचा दर्जा कमी कमी करत ट्रोलिंग वाढवायचं हा त्यांचा अजेंडा. दोन्ही बाजुंचे अजेंडे साध्य होत असतात. पण काही वेळेला यात ठिणगी पडते.
ज्यांना फॉलोअर्स वाढवण्याची गरजच नसते. अशा सेलिब्रिटिंना कुणी ट्रोल केलं की मग ट्रोलर्सची काही खैर नसते. सेलिब्रिटी त्यांची चांगलीच परेड घेतात. पण अनेकदा असे सभ्य सेलिब्रिटी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. जसं अन्याय करणारा दोषी तितकाच अन्याय सहन करणारा दोषी म्हणतात ना, तसंच या सेलिब्रिटींबाबत, तज्ज्ञ निरिक्षण नोंदवतात. ट्रोलिंग करण चुकीचं तसंच ट्रोलिंग सहन करणंही चुकीचंच असं तज्ज्ञ सांगतात.
ट्रोलर्स ट्रोल करताना समोरच्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यात त्यांना काही गैर वाटत नाही.हे प्रकार वाढले की त्याचं रुपांतर विकृतीत व्हायला वेळ लागणार नाही, याचा विचार आपण करायला हवा. सतत ट्रोल करणारी व्यक्ती हळुहळु सोशल मीडियावरच्या प्रत्येकाला ट्रोल करत सुटते. असं सतत ट्रोल करणं आपल्या आणि समाजाच्या आरोग्यासाठीही घातक आहे. त्यामुळे हे ट्रोलिंग थांबवुया...
ट्रोल करणा-यांना आत्मपरिक्षण करायला लावुया. आणि हो तुम्हाला कुणी ट्रोल करत असेल तर तुम्हीही त्यांना थांबवा. तरच सुदृढ समाज आकाराला येईल. नाहीतर पुढची पिढी म्हणजे ट्रोलिंग जमात होऊन जाईल. सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी सहज उपलब्ध झाल्यानं ट्रोलर्सचं फावलं, हेही तितकचं खरं...