MGR Birth Anniversary: असं म्हणतात की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं, त्याच व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करण्याची संधी मिळणं, त्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकणं ही बाब नशिबवंतांनाच मिळते. प्रेमाचं हे नातं आहेच तितकं सुंदर. एकमेकांना समजून घेत, एकमेकांची ताकद होत हे नातं दिवसागणिक आणखी दृढ होत असतं. यात चढ-उतारही असतात. एक माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करणारं हेच नातं ज्यावेळी तुटतं तेव्हा मात्र होणाऱ्या यातना शब्दांतही सांगता येत नाहीत. कित्येकांनी या परिस्थितीचा सामना केला असेल. अगदी दाक्षिणात्य कलाजगतातील सुपरस्टार एमजीआर यांनाही अशाच परिस्थितून पुढे जावं लागलं होतं.
एक अभिनेता, राजकीय नेता आणि व्यक्ती म्हणून एमजीआर (MGR ) यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. दक्षिणेकडे अनेकांसाठी तर ते देवच होते. त्यांच्याप्रती लोकांचं प्रेम नव्हे, तर वेड सातत्यानं पाहायला मिळालं. या अभिनेत्याला ठेच लागली की, त्याच्या वेदना चाहत्यांना होत असंच काहीसं हे नातं. अनेकांनाच जीव ओतून मदत करणाऱ्या एमजीआर यांचं व्यक्तीमत्त्वं हेवा वाटेल असंच होतं.
आपल्या अटीशर्तींवर चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या कलाकारासाठी निर्माते- दिग्दर्शक त्यांच्या सांगण्यावरून स्क्रीप्टमध्ये बदल करत होते. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या एमजीआर यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय होतं.
अन्नाद्रमुक पक्षाचे प्रमुख, तामिळ चित्रपट (Tamil Film Industry) जगाततील दिग्गज अभिनेत एमजी रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांच्यासोबत जयललिता यांनी जवळपास 28 चित्रपटांमध्ये काम केलं. जयललिता यांच्या मनात एमजीआर यांच्याप्रती प्रचंड आदर होता. त्यांच्यात असणारं नातं सारं जग पाहत होतं. खुद्द जयललिता यांनीच एकदा सांगितलेल्या अनुभवानुसार वाळवंटात चित्रीकरण सुरु असताना एमजीआर यांनी काळजीपोटी त्यांना उचलून घेतलं होतं. (MGR Birth Anniversary interesting facts affair with jaylalita latest Entertainment news)
एमजीआर यांचा शब्द जयललिता यांच्यासाठी प्रमाण होता. त्यांच्या सांगण्यावरूनच जयलिता यांनी कलाविश्वाला रामराम ठोकत राजकारणात प्रवेश केला होता. एमजीआर यांची तीन लग्न झाली होती. पण, तरीही ते वयानं 31 वर्षांनी लहान असणाऱ्या जयललिता यांच्यावर प्रेम करत होते. पण, हे नातं पूर्णत्वास गेलं नाही.
जयललिता यांच्याप्रती एमजीआर यांच्या कुटुंबात फक्त आणि फक्त तिरस्कारच होता. इतका की त्यांच्या निधनानंतरही कुटुंबीयांनी जयललिता यांना त्यांच्या घरात येऊ दिलं नव्हतं. शेवटी एमजीआर यांचं पार्थिव राजाजी हॉल येथे आणलं असल्याचं कळलं आणि जयललिता यांनी तिथं धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. सलग दोन दिवस त्या एमजीआर यांच्या पार्थिवाशेजारी उभ्या होत्या.
1953 मध्ये एमजीआर सक्रिय राजकारणात सहभागी झाले. रुग्णालयात असतानाच त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. 1984 मध्ये ज्यावेळी किडनी निकामी झाल्यामुळं उपचारांसाठी ते न्यूयॉर्कला गेले तेव्हा 13 चाहत्यांनी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. अनेकांनी त्यांना किडनी देण्यासाठी तार लिहिली. उपचारानंनंतर परतताच एमजीआर यांनी तिसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 24 डिसेंबर 1987 ला त्यांचं निधन झालं. हे वृत्त ऐकताच त्यांच्या 30 चाहत्यांनीसुद्धा टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्य संपवलं. एखाद्या कलाकाराप्रती असणारं चाहत्यांचं हे वेड पाहून तुम्ही काय म्हणाल?