मुंबई : भाऊ कदम, हे एक असं नाव जे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनाच्या अतिशय जवळ. एक कलाकार म्हणून कमी आणि हक्काची व्यक्ती म्हणून जास्त, याच नजरेतून भाऊकडे सर्वजण पाहतात. अगदी साध्याभोळ्या चेहऱ्याचा, स्वच्छ मनाचा आणि प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा भाऊ त्याच्या नुसत्या असण्यानंच खूप काही करुन जातो.
कुटुंबासाठी तो जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो आणखी एका खास व्यक्तीसाठीही महत्त्वाचा आहे.
खरंतर तिच्यासोबतचं त्याचं नातं आपण सर्वांनीच पाहिलंय, त्या नात्याचं कौतुकही केलंय. काही आठवतंय का, ही व्यक्ती कोण?
भाऊवरील प्रेम जाहीरपणे व्यक्त करणारी आणि त्याच्यासाठी काहीशी हसवणारी पण टचकन डोळ्याच पाणी आणणारी ही व्यक्ती आहे, अभिनेत्री श्रेया बुगडे.
श्रेयानं नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिनं भाऊशी एका सहकलाकारापलीकडे असणारं आपलं नातं सर्वांसमोर आणलं.
'भाऊ अगदी खरं सांगू तर तुम्ही एक खूप मोठे philosopher आहात, तुम्ही तुमच्या सहज वागण्यातन खूप गोष्टी शिकवता; जसं की, कितीही टेन्शन असलं तरी माणसाकडे एक डुलकी काढण्या इतका वेळ असतोच....
आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल मोठं होऊ द्यायचं नाही आणि आयुष्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद वेचणे...', असं तिनं लिहिलं.
श्रेयाची ही पोस्ट आणि त्यासोबत असणारा व्हिडीओ एकमेकांसाठी अगदी पूरक आहेत, जशी भाऊ आणि श्रेयाची ऑनस्क्रीन दिसणारी जोडी.
रोजच्या जीवनातून कायमच साधेपणाशी आपली गाठ पाडण्यासाठी श्रेयानं भाऊचे आभार मानले. श्रेयानं ही पोस्ट लिहिण्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे भाऊचा वाढदिवस.
तिची ही पोस्ट वाचून या हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी वाढदिवसच नव्हे, तर इतर कोणताही दिवस तितकाच समर्पक असेल अशा प्रतिप्रिया काही चाहत्यांनी दिल्या.