इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?

Maharashtra politics : आष्टीचे आमदार सुरेश धसांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिले आहे.  औरंगबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.

वनिता कांबळे | Updated: Feb 22, 2025, 08:43 PM IST
इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?

Mehbob Sheikh On Suresh Dhas : इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे सुरेश धस स्वत:च अडचणीत सापडले आहेत.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी धसांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. दरम्यान यानंतर न्यायालयानं सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. यामुळे सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली आहे. 

आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्याविरोधात अपक्ष भिमराव धोंडे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे मेहबूब शेख यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीत सुरेश धस यांना 1 लाख 40 हजार 507 मतं मिळाली तर भिमराव धोंडेंना 62 हजार 532 आणि मेहबूब शेख यांना 52 हजार 738 मतं मिळाली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांचा 77 हजार 975 मतांनी विजय झाला होता. विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस आमदार म्हणून निवडूण आले.

मेहबूब शेख यांनी  याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.  सुरेश धस यांनी निवडणुकीत धार्मिक कारणांवरुन मतं मागितली,  मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडीओ व्हायरल केले,  शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाब  टाकून मतदान करुन घेतलं, ईव्हीएम मशिनबाबतची सुरक्षा संशयास्पद होती.  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिनवरील सीलवर स्वाक्षरी केली नाही असे गंभीर आरोप मेहबूब शेख यांनी याचिकेत केले आहेत. 
न्यायालयानं सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मार्चला असून न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.