बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता 'ही' सेलिब्रिटी, सुरक्षा वाढवली!

बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या कथित हत्येची जबाबदारीही लॉरेंस बिष्णोई टोळीने घेतली होती. अशातच आता सलमान खान शिवाय मुनव्वर फारुकी हा देखील बिष्णोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 15, 2024, 02:30 PM IST
बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता 'ही' सेलिब्रिटी, सुरक्षा वाढवली! title=

Baba Siddique : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिष्णोई या टोळीने घेतली होती. यानंतर आता ही टोळी सलमान खानच्या मागे लागल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहेत. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अशा देखील बातम्या येत आहेत की, स्टँड-अप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकी देखील लॉरेंस बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर आला आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याची देखील सुरक्षा वाढवली आहे.

याआधी मुनव्वर फारुकीचा पोलिसांनी वाचवला होता जीव

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, लॉरेंस बिष्णोई टोळीकडून कॉमेडियनला धोका असू शकतो. धमकीचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी पोलीस अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉरेंस बिष्णोई टोळीतील काही सदस्यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता आणि मुनव्वर फारुकीचा पाठलाग देखील केला होता. मात्र, गुप्तचर यंत्रणेला याविषयीची माहिती मिळाली आणि त्यांनी वेळीच कारवाई करून मुनव्वर फारुकी त्या घटनास्थळावरून हटवून होणारा हल्ला हाणून पाडला. 

लॉरेंस बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर मुनव्वर फारुकी का? 

वास्तविक मुनव्वर फारुकीने त्याच्या अनेक शोमध्ये हिंदी देवी-देवतांची खिल्ली उडवली होती. त्यामुळे लॉरेंस बिष्णोई टोळी त्याच्यावर खूश नाहीये. नेमबाजांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात हिटिंगचे टास्क देण्यात आले होते. लॉरेंस बिष्णोई टोळीने मुंबईपासूनच त्याचा पाठलाग केला होता. तो ज्या फ्लाइटने जाणार होता त्याच प्लाइटने लॉरेंस बिष्णोई टोळीने प्रवास केला. त्याचबरोबर तो ज्या हॉटेलमध्ये थांबणार होता त्याच हॉटेलमध्ये लॉरेंस बिष्णोई टोळीने रुम बुक केली होती.  परंतु, गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्क केले आणि हा प्लॅन उधळून लावला. गेल्या काही वर्षांपासून मुनव्वर फारुकीला धमक्या देखील येत होत्या.

मुंबई पोलिसांनी धमक्या आणि लॉरेंस बिष्णोई टोळी यांच्यातील थेट संबंधाची अधिकृतपणे पुष्टी केली नसली तरी मुनव्वर फारुकीच्या सुरक्षेसाठी सुरु असलेल्या चिंतेमुळे ते हाय अलर्टवर आहेत.