बॉलिवूड फक्त वांद्रे आणि जुहूमध्ये...; अल्लू अर्जूनच्या वडिलांनी मांडलं परखड मत, 'भविष्यात त्यांची ओळख...'

दाक्षिणात्य चित्रपट महोत्सवात (South Indian Film Festival) निर्माते अल्लू अरविंद (Allu Aravind) यांनी तेलुगू चित्रपट आणि बॉलिवूड यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: Sep 19, 2024, 02:23 PM IST
बॉलिवूड फक्त वांद्रे आणि जुहूमध्ये...; अल्लू अर्जूनच्या वडिलांनी मांडलं परखड मत, 'भविष्यात त्यांची ओळख...' title=

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनचे वडील अल्लू अरविंद यांनी दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद याचं विश्लेषण केलं आहे. मार्चमध्ये झालेल्या दाक्षिणात्य चित्रपट महोत्सवात (South Indian Film Festival) अल्लू अरविंद यांनी आपलं मत मांडलं होतं, ज्याचा व्हिडीओ आता त्यांचा ओटीटी प्लॅटफॉर्म Aha वर शेअर करण्यात आला आहे. यादरम्यान त्यांनी बॉलिवूडसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी नेमकं काय योग्य करत आहे जे उत्तरेत जमत नाही आहे यावर ते बोलले होते. 

अल्लू अरविंद यांनी यावेळी पुष्पासारख्या पॅन इंडियन फिल्म्स आणि 80 च्या दशकातील चित्रपटांमध्ये नेमका काय फरक होता? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, "आता सर्व दरवाजे खुले कऱण्यात आले आहेत. चित्रपट संपूर्ण भारतभर स्विकारले जात आहेत. दाक्षिणात्य डब केलेले चित्रपटही चांगली कामगिरी करत आहेत. हिंदी चित्रपटांना तसाच प्रतिसाद का मिळत नाही याचं माझ्याकडे थोडं वादग्रस्त उत्तर आहे".

अल्लू अरविंद यांनी मुंबईतील निर्माते, दिग्दर्शक यांचा आपण आदर करतो असं स्पष्ट करताना ते एकाच प्रकारच्या साच्यात अडकले आहेत असं सांगितलं. ते म्हणाले की, "त्यांची विचार करण्याची पातळी चांगली आहे. पण त्याचवेळी ते कुठेतरी वांद्रे आणि जुहूमध्ये अडकले असल्याचं दिसत आहे. ते सर्वजण वांद्रे आणि जुहूमध्ये वाढले असल्याने त्यांची संस्कृती, दृष्टीकोन तसाच आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशही तिथे आहे याचा विचार त्यांनी करायला हवा.तेलुगू आणि तामिलमध्ये तयार झालेले चित्रपट बिहारमधील लोकांना का आवडतात?".

तथापि, अल्लू अरविंद यांना हे सर्व बदलत आह, आणि दक्षिणेकडील ‘ओळख’ यापुढे टिकणार नाही कारण हिंदी चित्रपट निर्मात्यांना व्यापक विचार करण्याची गरज असल्याची आवश्यकता जाणवत आहे असंही ते म्हणाले आहेत. “आता मी काही लोकांशी (हिंदी चित्रपटसृष्टीत) बोललो. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. त्यांना आता जाणीव झाली असून, तसे चित्रपट (विस्तृत प्रेक्षकांसाठी) तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिणेची ही विशिष्ट ओळख लवकरच नाहीशी होईल, कारण मुंबईतल चित्रपट निर्मातेही तसेच चित्रपट बनवतील. आता सर्वच चित्रपटसृष्टी जेव्हा त्यांच्याकडे संदर्भात कंटेंट आणि बजेट असेल पॅन इंडिया फिल्म्स बनवतील असं मला वाटतं,” असं ते म्हणाले.