Entertainment News : 1978 मध्ये एक असा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये एका अतिशय देखण्या अभिनेत्रीनं 'तुलसी' हे पात्र साकारलं होतं. हे पात्र, म्हणजे मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची दुसरी पत्नी. अभिनेत्रीनं साकारलेली भूमिका कमालीची गाजली आणि या अभिनेत्रीला लोक प्रत्यक्ष जीवनात विचारु लागले, 'तुम्हाला दुसरी पत्नी होणं आवडेल का?'. 'मनी कधीच सवत नाही होणार' अशा शब्दांत या अभिनेत्रीनं उत्तर दिलं. रंजक बाब म्हणजे आजपर्यंत या अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, तो चित्रपट होता, 'मैं तुलसी तेरे आंगन की'... आता तरी ओळखता येतंय का तिचं नाव?
खऱ्या जीवनातील 'हिरो' विषयी सांगणाऱ्या आणि आपण नेमकं लग्न का केलं नाही हे सांगणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे आशा पारेख. हिंदी सिनेजगतातील एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्रीनं आजवर अनेक भूमिका साकारल्या, प्रेक्षकांच्या काळजाचा ठावही घेतला. 'आशा पारेख: द हिट गर्ल' या आत्मचरित्रपर पुस्तकातून या अभिनेत्रीनं त्यांच्या जीवनातील काही खास क्षणांचा उलगडा केला.
'हो, नासिरसाहब एकमेव अशी व्यक्ती होते ज्यांच्यावर माझं प्रेम होतं. मी जर त्यांच्याविषयी लिहिलं नसतं ज्यांचं माझ्या जीवनातील स्थान महत्त्वाचं आहे, तर आत्मकथा लिहिणंच व्यर्थ ठरलं असतं', असं त्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटलं. आशा पारेख यांनी 7 चित्रपटांमध्ये नासिर हुसैन यांच्या दिग्दर्शनात काम केलं होतं. त्या दोघांच्याही वयात बरंच अंतर होतं, पण प्रेमाचं नातं इथं जिंकलेलं. 'मला कुटुंबात फुट पाडणारी व्हायचं नव्हतं', असं आशा पारेख यांनीच एका मुलाखतीत म्हटलं होतं. गतकाळात कलाविश्वात या नात्याची अनेकांना कल्पना होती, पण त्याची फारशी चर्चा झाली नाही.
एकाच मुलाखतीत या अभिनेत्रीनं खासगी जीवनातील अनेक पैलू उलगडले. 'लग्नाची नाती वर (स्वर्गात) ठरलेली असतात. बहुधा देव या बाबतीत मला विसरला असावा. योग नव्हताच म्हणून माझं लग्न झालं नाही. आईला वाटत होतं की माझं लग्न व्हावं. लग्नाच्या मागण्याही आल्या पण, पुढे काही घडलं नाही', असं त्या म्हणाल्या होत्या. कोणा एका व्यक्तीनं आपलं लग्न झालं तरीही ते टीकणार नाही अशी भविष्यवाणी केली होती, पण आईचा यावर विश्वास नसल्यानं ती सातत्यनानं आपल्यासाठी मुलं शोधत होती असं आशा पारेख सांगतात.
2017 मधील या मुलाखतीदरम्यान आशा पारेख यांनी लग्न होण्यापेक्षा योग्य व्यक्तीशी लग्न होणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं. लग्नं झालंय असं म्हणवून घेण्यासाठी म्हणून मी लग्न करणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं होतं. आशा पारेख यांचे वडील हिंदू आणि आई मुस्लीम होती. आईवडिलांची ही एकुलती एक मुलगी सिनेविश्वावर अधिराज्य करताना दिसलीच पण, आता उतारवयात याच आशा पारेख त्यांच्या जीवाभावाच्या मैत्रिणींसमवेत उत्तम आयुष्य जगताना दिसतात. हेलन, वहिदा रहमान या आणि अशा मैत्रिणींसह त्या अनेकदा परदेश दौरे आणि सहलींवरही जाताना दिसतात.