मुंबई : CoronaVirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. घोषणा झाल्या क्षणापासून याची अंमलबजावणीही झाली. लॉकडाऊनच्या या पार्श्वभूमीवर अनेक व्यवहार ठप्ल झाले. जीवनावश्यक क्षेत्र वगळता इतरही बऱ्याच क्षेत्रांचा कामकाज थंडावलं. कलाविश्वावरही याचे थेट पडसाद उमटले. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षी काही सेलिब्रिटी जोड्या या लग्नबंधनात अडकण्याच्याही तयारीत होत्या. पण, एकंदर परिस्थिती पाहता त्यांच्या लग्नाचे बेतही पुढे गेले आहेत.
लग्नाचे बेत पुढे गेल्याच्या या प्रसंगी आपले पैसे वाचल्याची प्रतिक्रियाही एका अभिनेत्याने दिली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभच पुढे गेल्याच्या या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे, अभिनेता अली फजल याला.
नुकत्याच एका मुलाखतीत त्याने अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्यासोबतचं आपलं नातं आण लग्न या गोष्टींवर आपली मतं मांडली. 'लग्नाच्या निर्णयावर आम्हीच ठाम नव्हतो. त्यामुळे मग आम्ही ना ह़ॉल बुक केला होता किंवा पत्रिकाही छापल्या नव्हत्या'; असं करणं फायद्याचंच ठरलं असा सूर आळवत किमान आपले पैसे वाचल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. अर्थात विनोदी अंदाजात त्याने ही प्रतिक्रिया दिली असली तरीही परिस्थितीचं गांभीर्यही त्याने नाकारलेलं नाही.
एप्रिल महिन्यात अली फजल आणि रिचा चड्ढा लग्न करणार असल्याचं बोललं गेलं होतं. पण, कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे आता हा सेलिब्रिटी विवाहसोहळा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
कोरोना विषाणूचा झपाट्याने वाढणारा संसर्ग ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं म्हणत अलीने या आव्हानात्मक काळात मदतीचा हात देणाऱ्या प्रत्येकाचं कौतुकही केलं. सध्याची परिस्थिती पाहता आपण नेमके कोणत्या दिशेने जात आहोत हेच कळत नसल्याचा चिंताजनक सूर त्याने आळवला.