मुंबई : गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनेता सैफ अली खान कलाविश्वात सक्रिय आहे. बॉलिवूडचा 'नवाब' म्हणून त्याची एक वेगळीच ओळख. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि भारतीय क्रिकेट संघात टायगर पतौडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांचा हा मुलगा. कुटुंबाची परंपरा, नवाबांचा वारसा अशा एकंदर वातावरणात सैफ मोठा झाला. पण, पुढे त्याने मुंबई गाठत कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
इथे अभिनेता म्हणून सैफ नावारुपास येत असतानाच त्याच्या खासगी आयुष्यात, कुटुंबातही बऱ्याच घडामोडी घडत होत्या. आजच्या घडीला सैफ, त्याची पत्नी; अभिनेत्री करिना कपूर खान, मुलगा तैमुर यांचे पतौडी पॅलेस या आलिशान महालातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात तेव्हा प्रत्येकाला हेवा वाटतो. पण, ही वडिलोपार्जित वास्तू 'परत' मिळवण्यासाठी सैफला काही महत्त्वाचे निर्णय़ही घ्यावे लागले होते.
एका मुलाखतीत त्याने याविषयीची माहिती दिली. वडिलांच्या निधनानंतर निमराणा हॉटेल्स, अमन नाथ आणि Francis Wacziarg यांनी पॅलेसरुपी हॉटेल चालवण्याची जबाबदारी घेतली होती. सैफने सांगितल्यानुसार, Francis Wacziarg यांनी पतौडी पॅलेस परत हवे असल्यास आम्हाला याविषयी कळव असं एकदा स्पष्ट केलं होतं. ज्यानंतर सैफने तसं केलंही. ज्यासाठी त्याला अमाप पैसे मोजावे लागले.
जी वास्तू वारसा हक्क म्हणून मिळणं अपेक्षित होती, त्यासाठी सैफला त्याने आतापर्यंत अभिनय कारकिर्दीतून कमवलेले पैसे मोजावे लागले होते. यातून एक बाब त्याच्या लक्षात आली, ती म्हणजे तुम्ही भूतकाळात राहूच शकत नाही. किमान आपण तरी भूतकाळात राहू शकत नसल्याचं म्हणत काही भूखंड, इतिहास, संस्कृती, परंपरा, सुरेख छायाचित्र याशिवाय त्यातून काहीच मिळत नसल्याचं वास्तव त्याने सर्वांसमोर आणलं. सैफच्या या मुलाखतीतून त्याने नकळतपणे काही गोष्टी सर्वांसमोर आणल्या. सहसा त्याला वारसा हक्क म्हणून अनेक गोष्टी मिळणं स्वाभाविक आहे, असाच अनेकांचा समज. पण, सैफने मात्र एक वेगळं चित्र सर्वांसमोर ठेवलं आहे.