मुंबई : लता मंगेशकर.... हे नाव नाही तर ही एक जाणीव आहे, हा एक अनुभव आहे, एक विद्यापीठ आहे. दीदींनी रविवारी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. एका वेगळ्या जगात सध्या ही स्वरलता स्थिरावली. पण, अनेकांनाच तिनं पोरकं केलं. अशा या अभिजात गायिका, लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील किस्सेही तितकेच ऐकण्याजोगे. (Lata Mangeshkar)
बऱ्याच संगीतदारांसोबत दीदींनी गाणी गायली. विविध धाटणीच्या गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला. शंकर जयकिनश, एस.डी. बर्मन अशा बऱ्याच संगीतकारांसाठी त्यांनी काम केलं.
प्रत्येकासाठी लता म्हणजे अतीमहत्त्वाची व्यक्ती. बर्मन दांचंसुद्धा असंच काहीसं. दीदीनी एकदा त्यांच्यासाठी 'पग ठुमत चलत' हे गाणं गायलं. रेकॉर्डिंगनंतर बर्मन दांनी गाण्याच्या टेकला ओके म्हटलं.
ओके, टेक मिळालेलं गाणं अंतिम ठरतं. पण, हेच गाणं पुन्हा रेकॉर्ड करावं लागणार असा निरोप त्यांनी दीदींपर्यंत पोहोचवला.
लता मंगेशकर यांनी त्यादरम्यान काही रेकॉर्डिंग आणि कार्यक्रमांना वेळ दिला होता. त्यामुळे मी ही कामं आटोपली की लगेचच बर्मन दांसाठी येऊन गाणं रेकॉर्ड करेन असा निरोप त्यांनी पाठवला.
निरोप पाठवलेल्या व्यक्तीनं मात्र लतादीदींनीचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने एस.डी. बर्मन यांच्यापर्यंत पोहोचवलं. ते असं कसं करु शकतात, गाणं पुन्हा रेकॉर्ड करणं म्हणजे काय... असं सगळं चुकीचं त्यांना सांगितलं.
बस, मग काय... या नात्यात मीठाचा खडा पडायला इतकंच पुरेसं होतं. मै लता से गाना नही गवाऊँगा असं म्हणत.... त्यांनी निर्धार केला. दीदींच्या कानांवर ही गोष्ट आली.
आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीने मांडलं गेल्याचं लक्षात येताच त्यांनी बर्मन दांना फोन केला आणि त्यांना म्हटलं, आपने ऐसे कहा... आप कोईभी परेशानी मत लिजिये...
तुम्ही कोणतेही कष्ट घेऊ नका, कारण मीच तुमच्यासोबत काम करणार नाही; अशा शब्दांत दीदींनी सचिन देव बर्मन अर्थात एस.डी. बर्मन यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
जवळपास तीन वर्षे हे दोन्ही दिग्गज एकमेकांशी बोलत नव्हते. पण, पुढे आर.डी. बर्मन यांनी जेव्हा संगीत क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा त्यांच्यासाठी दीदींनीच पहिलं गाणं गायलं होतं.
खुद्द एस.डी. बर्मन यांनी दीदींना घरी जेवायला बोलावलं आणि त्यानंतर त्यांनी परिस्थिती त्यांना सांगितली. दीदी गाण्यासाठी तयार झाल्या आणि गैरसमजांचा हा बर्फाचा डोंगर तिथेच वितळला.