मुंबई : मंगळसूत्राच्या जाहिरातींना होणारा विरोध पाहता सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यानं अखेर एक मोठा निर्णय घेतला. समाजातील एका घटकाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर झाला, ज्यामुळं खंत व्यक्त करत त्यानं हे पाऊल उचललं. (Sabyasachi Advertisment)
सब्यसाचीनं पोस्ट केलेल्या या जाहिरातींमध्ये मॉडेल्स लो नेकलाईन आणि अंडरगार्मेंटमध्ये इंटिमेट पोझ देत या मंगळसूत्राला फ्लाँट करताना दिसल्या. सब्यसाचीच्या जाहिराती सहसा काही संकल्पनांना छेद देणाऱ्या असतात. पण, यावेळी मात्र त्याच्या या जाहिरातीची संकल्पना अनेकांना रुचली नाही.
जाहिरातीला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला, ज्यानंतर त्यानं सर्व माध्यमांवरून ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही जाहिरात अश्लील आणि आक्षेपार्ह असल्याचं म्हणत त्यांनी 24 तासांत जाहिरात मागे घेण्याचा इशारा दिला.
इशारा पाहून अखेर सब्यसाचीनं जाहिरातच मागे घेण्याचा निर्णय घेतला. संस्कृतीला मोठ्या वर्गापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं साकारण्यात आलेल्या जाहिरातीनं समाजातील एका वर्गाला दुखावलं, या साऱ्यामुळं खंत व्यक्त करत आपण जाहिरात मागे घेत असल्याचं त्याने सांगितलं.
सोबत एक इन्स्टा पोस्टही केली. सोशल मीडियावर सब्यसाचीच्या या जाहिरातीवर अनेकांनीच प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं यामध्ये जाहिरातीला विरोध करणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं.