मुंबई : बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'.दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.'बापल्योक' या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स'च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
तर दुसरीकडे पुष्कर जोगचा वडिलांवर आधारित बापमाणूस हा सिनेमादेखील याच दिवशी रिलीज होतोय. खरंतर बापमाणूस हा सिनेमा 25 सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र आम्हाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता पुष्कर जोग म्हणाला, मराठी प्रत्येक सिनेमा चालायला हवे यासाठी मी माझ्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलतोय. सुभेदार आणि बापल्योक सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार याचा फटका कोणालाच बसू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. असं मत त्याने आम्हाला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे.
मात्र नुकताच बापल्योक या सिनेमाने रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता एकाच दिवशी मराठीतले वडिलांवरील आधारित बापल्योक आणि बापमाणूस हे सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाचा डंका वाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बापल्योक चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. तर 'बापमाणूस' या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश फुलपगारे यांचं आहे. आनंद पंडित,रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर वैशल शाह,राहुल दुबे चित्रपटाचे सह-निर्माते आहे. पुष्कर जोग,किया इंगळे व्यतिरिक्त अनुषा दांडेकर,कुशल बद्रिके,शुभांगी गोखले यांनीही 'बापमाणूस'चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. बापमाणूस या सिनेमात पुष्कर जोग वडिलांच्या भूमिकेत आहे तर केया इंगळे ही चिमुकली लेकीच्या भूमिकेत आहे. तर अनुषा दांडेकर या सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण करत आहे.