Raghav Tiwari Attacked: बॉलिवूड चित्रपट, वेब सिरीज आणि क्राईम पेट्रोल सारख्या शोमध्ये काम करणारा बॉलिवूड अभिनेता राघव तिवारी याच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अभिनेता राघव तिवारी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या हल्ला प्रकरणी आरोपी मोहम्मद जैद परवेझ शेख याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 118 (1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.
नेमकं काय घडलं?
क्राईम पेट्रोल फेम अभिनेता राघव तिवारीने सांगितले की, तो त्याच्या मित्रासोबत शॉपिंग करून घरी परतत होता. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना त्याची दुचाकीला धडक बसली. यामध्ये राघवने सांगितले की ही त्याची चूक होती, म्हणून त्याने लगेच माफी मागितली आणि पुढे जाऊ लागला. मात्र आरोपी दुचाकीस्वाराने शिवीगाळ सुरू केली. त्यादरम्यान राघवने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता आरोपीने दुचाकीवरून खाली उतरून रागाच्या भरात त्याच्यावर दोन वेळा चाकूने हल्ला केला. यानंतर आरोपीने राघवला लाथ मारली, त्यामुळे तो खाली पडला.
पुढे राघव म्हणाला की, त्यानंतर आरोपीने दारुची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. यावेळी संरक्षणासाठी राघवने त्या ठिकाणी पडलेले लाकूड उचलले आणि आरोपीच्या हातावर मारले. यामध्ये आरोपीच्या हातातील बाटली जमीनीवर पडली. आरोपीला राग आला आणि त्याने राघवच्या डोक्यात लोखंडी रॉडने दोन वेळा वार केले. यामध्ये राघव गंभीर जखमी झाला. तिथे असणाऱ्या राघवच्या मित्रांनी त्याला लगेच रुग्णालयात नेले, तेथे राघववर उपचार करण्यात आले. उपचारानंतर राघवने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या कारवाईवर अभिनेत्याची नाराजी
अभिनेता राघवने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. आरोपी अद्याप अटक केलेली नसून तो मुक्तपणे फिरत आहे. यावेळी अभिनेत्याने आरोपी त्याच्या इमारतीच्या खाली दिसत असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे राघवने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला काय झाले तर त्याची सर्व जबाबदारी पोलिसांची असेल असं राघव यावेळी म्हणाला.