छगन भुजबळांच्या मनात काय असा सवाल आता पुन्हा उपस्थित झाला आहे. कारण छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीत नाराज असलेले भुजबळ आता वेगळा निर्णय घेणार का याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळ राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरु असतानाच भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारल्यापासून भुजबळांच्या नाराजीची सुरुवात झालीय
मंत्रीपद नाकारल्यानं नाशिकमध्ये भुजबळांनी शक्तिप्रदर्शन केलं. समता परिषदेची बैठक घेऊन वेगळी भूमिका घेण्याचे संकेत छगन भुजबळांनी दिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यात भुजबळ गेले खरे पण ते काही तासानंतर मेळाव्यातून माघारी परतले. तर नाशिकमध्ये अमित शाहांच्या कार्यक्रमात भुजबळ त्यांच्या शेजारी बसल्याचं पाहाला मिळालं. त्यानंतर भुजबळांच्या निकटवर्तीय असलेल्या दिलीप खैरेंना शुभेच्छा देणा-या बॅनरमधून अजित पवार आऊट झाले तर मोदी आणि अमित शाहा इन झाल्याचं पाहायला मिळालं. काल तर भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्धातास चर्चा केली आहे.
सागर बंगल्यावर जाऊन भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. भेटीनंतर भुजबळांना राष्ट्रवादीच्या बैठकीविषयी विचारलं असता त्यांनी जिकडे गरज नाही तिकडे जाणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली.
मंत्रीपद नाकारल्यानं भुजबळांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर भुजबळांचा राष्ट्रवादीसोबतचा दुरावा वाढतच गेल्याचं पाहायला मिळालं आहे. तर दुसरीकडे भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात गैर काय असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
सागर बंगल्यावर फडणवीस आणि भुजबळांची बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली आहे. या चर्चेत दोन्ही नेत्यांचं काय ठरलं याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय.. त्यामुळ आता भुजबळ काही मोठा निर्णय घेणार का हे आता पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच..