मुंबई : नुकताच दहावी 2018 चा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना या निकालात भरघोस यश मिळालं. मात्र काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. कठोर प्रयत्न करूनही काही विद्यार्थ्यांना निकालात अपयश मिळालं आहे. पण या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करायला हवा. कारण आताचा दहावीचा निकाल हे तुमच्यातील शैक्षणिक बदलासाठी अत्यंत महत्वाचं असलं तरीही यातून तुमचं भविष्य ठरत नाही हे नक्की... कारण आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहिल्या आहेत.
दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी स्वतः दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपला दहावीचा निकाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेचे सिनेमे आपण साऱ्यांनी पाहिलेच आहेत. राष्ट्रीय पुरस्कारावर सतत आपली छटा उमटवणारा आणि आपल्या सिनेमांच्या माध्यमातून जगभरात मराठी सिनेमांची दखल घ्यायला भाग पाडणारा नागराज मंजुळे देखील दहावीत एकदा नव्हे तर दोनदा नापास झाला होता. असं असलं तरीही नागराज मंजुळेच्या सैराट या सिनेमाने तब्बल 100 कोटीचा आकडा गाठला आणि समाजात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
हा नागराज मंजुळे दहावीत दोनदा नापास झाला. मार्च 1992 मध्ये दहावीचा नागराजने रिझल्ट शेअर केला आहे. यामध्ये नागराजला 38.28 टक्के मिळाल्याचं दिसत आहे. काही विषयांत अगदी काठावर नागराजने गुण मिळवले आहेत. असं सगळं असलं तरीही नागराजने आपल्या कलागुणांना वाव देत वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणताही टोकाचा निर्णय न घेता. पुढच्या परिक्षेसाठी आणखी जोमाने तयार करावी. आताच्या अपयशाने खचून न जाता प्रयत्न करावा आणि घवघवीत यश संपन्न करावं.