मुंबई : झी टीव्हीवरील सुपरहिट टीव्ही शो 'कुबूल है'मध्ये हसिना बीवीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री निशी सिंह भडाली यांचं निधन झालं आहे. निशी सिंहने हिटलर दीदी, इश्कबाज आणि तेनाली रामासह अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं. 2020 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्या दीर्घकाळ आरोग्याच्या गंभीर समस्यांशी झुंज देत होत्या. या अभिनेत्रीचं आज दुपारी तीनच्या सुमारास निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, लेखक-अभिनेते संजयसिंग भाडली आणि दोन मुलं असा परिवार आहे.
निशी सिंग या हार्ट पेशंट होत्या
दिवंगत अभिनेत्रीचे पती संजय सिंह भादली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिच्या तब्येतीची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ''3 फेब्रुवारीला त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला पण त्या लवकर बऱ्याही झाल्या. मात्र, मे 2022 मध्ये त्यांना आणखी एक आजार झाला आणि त्यांची प्रकृती ढासळू लागली. आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी घशात संसर्ग झाल्याची तक्रार केली होती, त्यामुळे त्यांचं खाणं पिणं कठीण झालं होतं. त्यामुळे त्यांना जेवणात फक्त लिक्वीड फूड दिलं जात होतं. सर्वात मोठी विडंबना म्हणजे आम्ही त्यांचा 50 वा वाढदिवस आदल्या दिवशी 16 सप्टेंबर रोजी साजरा केला आणि ती खूप आनंदी दिसत होत्या.''