Chhagan Bhujbal : नाशकात लागलेल्या एका होर्डींगची सध्या राज्यभर आणि सत्ताधारी महायुतीतही चर्चा रंगलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि नाराज नेते छगन भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेत. मात्र या होर्डींगवर कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा फोटो नाही. मात्र भुजबळांच्या या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो आवर्जून लावण्यात आलेत. यामुळे छगन भुजबळ भाजपात जाण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागलीय.
खरंतर महायुतीचं सरकार आल्यापासून मंत्रीपदापासून वंचित ठेवलेले भुजबळ नाराज आहेत. याबाबात त्यांना विचारलं असता थर्मामीटर लावलं पाहिजे असे सांगत त्यांनीच खुलासा केला आहे. भुजबळांना मंत्रीपद मिळालं नसलं तरी राज्यपालपदासाठी त्यांचं नाव चर्चेत असल्याच्या बातम्या आल्या. मात्र राज्यपाल होणं म्हणजे तोंड बंद करणे आणि ते माझ्याकडून होणार नाही असं एका वर्तमानपत्रात मुलाखत देताना त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे भुजबळ आता भाजपात प्रवेश करताना केंद्रीय मंत्रीपद मिळवणार की राज्यमंत्रीपद याचीही चर्चा सुरूय. या सगळ्या चर्चांचाही भुजबळांनी इन्कार केला आहे.
एकीकडे नाराज छगन भुजबळ सध्या ना महायुतीत सक्रीय दिसताहेत.. ना राष्ट्रवादीत... भुजबळांच्या मतदारसंघात, येवल्यातही छगन भुजबळांऐवजी सध्या समीर भुजबळ हे अधिक सक्रीय झालेत. येवल्यातील मूलभूत समस्यांपासून नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीकडे समीर भुजबळच लक्ष देतायत. त्यामुळे मंत्रीपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीवर नाराज छगन भुजबळ आता राज्याच्या राजकारणातून निवृत्त होणार हे निश्चित मानलं जातंय.. मात्र भूजबळ भाजपचा हात हाती घेऊन केंद्रात जाणार का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र नाशकातल्या होर्डींगवर अजितदादा गायब होऊन मोदींचा फोटो येणं खूप काही सांगून जातोय.