Happy Birthday : मुमताज, जाणून काही खास गोष्टी

मुमताज आज त्यांच्या कर्म भूमी मुंबई पासून फार लांब लंडनमध्ये असल्यातरी त्यांची कमतरता बॉलिवूडला नेहमीच जाणवते. 

Updated: Jul 31, 2019, 03:02 PM IST
Happy Birthday : मुमताज, जाणून काही खास गोष्टी title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवलेली आणि आता सुद्धा चाहत्यांच्या मनात कायम असलेल्या अभिनेत्री मुमताज यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या जमान्याची प्रसिद्ध आणि तितकीच सुंदर मुमताज आज ७२वा जन्मदिवस साजरा करत आहेत. पडद्यावर त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुरलेले असत. त्यांच्या मनमोहक अदा आणि अंदाज चाहत्याला घायाळ करत असत. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मुमताज आज त्यांच्या कर्म भूमी मुंबई पासून फार लांब लंडनमध्ये असल्यातरी त्यांची कमतरता बॉलिवूडला नेहमीच जाणवते. तर मग त्यांच्या वाढदिवसादिवशी जाणून घेवू त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी...

३१ जुलै १९४७ रोजी त्यांनी मुंबईत जन्म घेतला. लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या मुमताजने त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण केले. त्यांची आई नाज आणि मावशी निलोफर देखील आभिनय क्षेत्रात सक्रीय होत्या. परंतू त्या जूनियर कलाकार म्हणून काम करत होत्या. 

६० च्या दशकात मुमताज छोट-छोट्या भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीस आल्या. त्यानंतर त्यांच्या अभिनयाचे गोडवे सर्वत्र पसरायला सुरूवात झाली. त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले ते अभिनेता दारा सिंग यांच्या सोबत भूमिका साकारल्यानंतर. दोघांनी एकत्र एकापाठोपाठ चक्क १६ चित्रपटांमध्ये काम केले. त्यांपैकी १० चित्रपट चांगलेच गाजले.

त्यानंतर मुमताज यांचे नाव यशाच्या उच्च शिखरावर पोहचले. दारा सिंगनंतर त्यांना साथ मिळाली ती अभिनेता राजेश खन्ना यांची. हा काळ त्यांच्यासाठी सोनेरी काळ होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

मुमताज-राजेश पडद्यावर झळकले तर तो चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असे ठरलेलेच होते. 'दो दोस्त', 'सच्चा-झुठा', 'आपकी कसम', 'अपना देश', 'प्रेम कहानी', 'रोटी' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून मुमताज-राजेश चाहत्यांच्या भेटीस आले. 

याच दरम्यान त्यांच्या नात्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. जेव्हा मुमताज यांनी १९७४ साली लग्न केले तेव्हा मात्र राजेश यांच्या मनाला ठेच पोहचली. मुमताजने लग्नाची घाई करू नये अशी त्यांची इच्छा होती. 

लग्नानंतर मात्र मुमताज चंदेरी दुनीयापासून फार दूर गेल्या. त्यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल १०८ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यामधील अनेक चित्रपट हिट ठरले. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी १९८९ साली 'आंधियां' चित्रपटाच्या मध्यमातून पून:पदार्पण केले. पण चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी बॉलिवूडकडे पाठ फिरवली. 

त्यानंतर स्तन कर्करोगाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना त्याचप्रमाणे समस्त कलाविश्वाला मोठा धक्क बसला. परंतू या गंभीर आजारावर त्यांनी मात केली. अभिनेता संजीव कुमारसह साकारलेल्या 'खिलोना' चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले.