मुंबई : 'पाचोळा सैरावैरा....' असे शब्द आणि शांततेला भेदणारा आवाज कानांवर पडलला की लगेचच डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे नाईकांचा वाडा. कोकणच्या नयनरम्य वातावरणात उभा असणारा हा वाडा खास आहे तो म्हणजे त्यात राहणाऱ्या लोकांमुळे आणि घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे. याच वाड्यात राहणाऱ्या मंडळींवर आणि त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांवर भाष्य करणारी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
'रात्रीस खेळ चाले', असं नाव असणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भीती तर निर्माण केली. पण, त्यासोबतच प्रचंड लोकप्रियताही मिळवली. अशी ही मालिका काही काळाच्या विरामानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
झी मराठीच्या फेसबुक पेजवरुन या मालिकेच्या प्रोमोचा व्हि़डिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये नाईकांचा वाडा हा वेगळ्याच रुपात आपल्या समोर येतो. उध्वस्त, धूळ खात पडलेला हा वाडा, तुटलेला पाळणा आणि कुलूपबंद दार... असं चित्र डोळ्यांसमोर येतं. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसं धाडकन दार आतून कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात येतं आणि पांडूचा आवाज येतो. पांडूमागोमागच नाईकांच्या वाड्यातील इतरही पात्रांचा आवाज कानावर येतो आणि आभास होतो तो नव्या खेळाचा.
अशा या 'रात्रीस खेळ चाले'चं नवं पर्व तोच थरकाप उडवण्यास पुन्हा यशस्वी ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. १४ जानेवारीपासून ही मालिका सुरु होणार असून, सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव, पांडू ही सगळी पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहेत.