मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणारा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या मॅन व्हर्सेस वाईल्ड Man vs Wild या कार्यक्रमाच्या खास भागाचं अखेर आज म्हणजेच सोमवारी १२ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसारण करण्यात येणार आहे. उत्तराखंडमध्ये असणाऱ्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात मोदी आणि बेअर यांच्यासोबत एका थरारक अशा सफरीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.
बेअरसोबत या कार्यक्रमादरम्यान मोदी वन्यजीव संवर्धनाच्या मुद्यावर काही खास मुद्दे मांडणार आहेत, ज्यामध्ये बेअरचेही विचार सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच या खास भागाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात आले होते. ज्यानंतर सर्वत्र या खास भागाचीच चर्चा झाली.
'एएनआय'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बेअरने या खास भागातविषयी अत्यंत महत्त्वाची बाब उघड केली. ज्यामध्ये त्याने या भागात कोणतंही किटक, किडा न खाल्ल्याचं स्पष्ट केलं. मोदी हे पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे आपण असं काहीही न केल्याचं त्याने सांगितलं.
रानावनात अडकल्यास, त्या परिस्थितीच जीव वाचवण्यासाठी प्राणी किंवा किटक खाणं महत्त्वाचं नाही. फळं, भाज्या, रानभाज्या, वनस्पती, कंदमुळं या गोष्टीही चालू शकतात, असं म्हणत मोदींनी स्वत: त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे ही अशाच वातावरणात व्यतीत केली होती. त्यामुळे त्यांना आता अशा वातावरण्यात वावरण्यात कोणताच संकोचलेपणा वाटला नाही, असंही बेअरने सांगितलं.
साऱ्या विश्वात डिस्कव्हरी इंडिया वाहिनीवर हा खास भाग दाखवण्यात येणार आहे. तुम्ही भारतात असाल तर, केबल आणि डिश टीव्ही नेटव्हर्कच्या सहाय्याने तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. भारताबाहेर असणारेही हा भाग डिस्कव्हरी वाहिनीवर पाहू शकतात.
१२ ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी भारती प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजचा हा कार्यक्रम सुरु होणार आहे. इंग्रजी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, मल्याळम अशा आठ भाषांमध्ये हा कार्यक्रम पाहता येणार आहे. जो एकाच वेळी डिस्कव्हरीच्या १२ वाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहे. यामध्ये डिस्कव्हरी, डिस्कव्हरी, एचडी वर्ल्ड, ऍनिमल प्लॅनेट, ऍनिमल प्लॅनेट एचडी वर्ल्ड, टीएलसी, टीएलसी एचडी वर्ल्ड, जीत, जीत प्राईम एचडी, डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो, डिस्कव्हरी किड्स अशा वाहिन्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स आणि पीएमओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हा भाग प्रसारित होणार आहे. पण, यासंदर्भातील तारखा अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.