मुंबई : 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोमुळे अनेक चेहऱ्यांना प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळाली. याच कार्यक्रमातील दोन स्पर्धक, किंबहुना त्यांची जोडी मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आली आहे.
निमित्त ठरतंय ते म्हणजे, त्यांच्यातील 'खास' मैत्रीचं नातं. ही जोडी म्हणजे पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांची.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ही जोडी आता हळूवारपणे थेट देशाच्या बाहेर पोहोचली आहे. परदेशातूनच या जोडीनं काही फोटो शेअरही केले आहेत.
इंटरनॅशनल टूरच्या निमित्तानं सध्या अरुणिता आणि पवनदीप लंडनला आहेत. कमी वायातच या दोघांनाही मिळणारी पसंती खूप काही सांगून जात आहे.
इंडियन आयडॉल 12 मधील इतरही काही स्पर्धकांचा या टूरमध्ये सहभाग आहे. सोशल मीडियावर चाहत्यांना यादरम्यानचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
दिवाळीच्या निमित्तानं या जोडीनं काही फोटो सर्वांच्याच भेटीला आणले. या फोटोंची पोस्ट समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला आवरणंही शक्य नव्हतं.
सोशल मीडियावरील नव्या फोटोंपैकी एकामध्ये अरुणिता सुंदर साडी नेसलेली दिसत आहे, या लूकला तिनं ओव्हरकोटची जोड दिली आहे. तर, पवनदीपनं हा लूक पांढरा ओव्हरकोट, सदरा आणि सुती धोतरवजा पायजमा यांनी पूर्ण केला आहे.
दरम्यान, कला वर्तुळात या जोडीच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरलेला असताना आता मात्र ही जोडी त्यांच्या मैत्रीच्याच नात्यावर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे. शिवाय आपण फक्त गाण्यापुरताच पार्टनर असल्याचंही स्पष्टपणे सांगताना दिसत आहे.