मुंबई : ऑस्कर पुरस्कार विजेत्या 'Period. End of Sentence' या माहितीपटाने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. पण, या पुरस्कारांनंतर काही महिन्यांनी त्यात झळकणाऱ्या उत्तर भारतातील दोन तरुणी चर्चेत आल्या आहेत. आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांची नावं पुन्हा प्रकाशझोतात आली आहेत.
काथिखेडा येथील सॅनिटरी पॅड बनवण्याच्या कारखान्यात कामाला असणाऱ्या या दोन्ही बहिणींना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. नोकरीअभावी आता त्या दोघींनाही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लघुपटाला आंतरराष्ट्रीय दर्जावर मिळालेल्या यशानंतर त्या दोघींनाही प्रसिद्धी मिळाली होती. पण, एकिकडे यश आणि आनंदाने त्यांच्या आयुष्यात बरसात करण्यास सुरुवात केली असतानाच त्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं.
'एएनआय' आणि इतर माध्यमांच्या वृत्तानुसार बक्षिस स्वरुपात मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम त्यांनी 'फ्लाय' या फॅक्टरीकडून आणि संबंधित एनजीओला (स्वयंसेवी संस्थेला) द्यावी अशी विचारणा त्यांना करण्यात आली होती. पण, त्यांनी असं करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे त्यांना नोकरीवरुन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
ऑस्करमध्ये नावाजलेला माहितीपट हा स्वयंसेवी संस्थेच्या काही कल्पना आणि उपक्रमांवर आधारलेला होता, त्यामुळे बक्षीसाच्या रकमेवर त्या संस्थांचा हक्क असल्याचं सांगत त्या दोघींकडे पैशांची मागणी करण्यात आली होती.
Sneha who appeared in 'Period. End of Sentence' that won Oscars'19 for 'Best Documentary Short Subject', says, "We've left the unit (NGO Action India) as we've not been paid our salaries for Apr&May.They asked Suman to given them one lakh which she received as prize money" #Hapur pic.twitter.com/Wzd256MsLc
— ANI UP (@ANINewsUP) June 3, 2019
आपल्यावर ओढववेल्या या प्रसंगाविषयी माध्यमांशी संवाद साधत २८ वर्षीय सुमन म्हणाली, 'माझे पती एका स्थानिक बँकेत सुरक्षा रक्षकाचं काम करतात. आमचा महिन्याचा खर्चही भागत नाही. मलाही तीन महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता. याविषयी संबंधितांना विचारताच, मला याआधीच एक लाख रुपये देण्यात आल्याचे सांगत मला आता पैशांची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आणि नोकरीही सोडण्यास सांगण्यात आलं.' तर, शिकवणी आणि शिक्षणाचा खर्च झेपत नसल्यामुळे २२ वर्षीय स्नेहावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
माध्यमांमध्ये या दोघींवरही आलेल्या या संकटाची माहिती मिळताच संबंधितांनी यातून अंग काढून घेतल्याचं पाहायला मिळालं. हापूर येथील अॅक्शन इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक देवेंदर कुमार यांनी हे आरोप फेटाळले आहेत. प्रसिद्धीमुळे त्या दोघींनीही कामाची टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याचं म्हणत दोन महिन्यांपर्यंत हा सर्व प्रकार सुरु असल्याचे आरोप त्यांनीह या दोघींवर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.