#MeToo : लैंगिक छळाचा आरोप असलेल्या व्यक्तीला अख्तर म्हणाले 'सर्वात सभ्य व्यक्ती'

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर या व्यक्तीचं समर्थन करताना त्यांचं मत शेअर केलंय

Updated: Jan 17, 2019, 10:35 AM IST
#MeToo : लैंगिक छळाचा आरोप असलेल्या व्यक्तीला अख्तर म्हणाले 'सर्वात सभ्य व्यक्ती' title=

मुंबई : लैंगिक छळाच्या आरोपांत अडकलेल्या सिनेदिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या बचावासाठी आता प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर पुढे आलेत. हिरानी यांचा बचाव करत जावेद अख्तर यांनी त्यांचा बॉलिवूडचे 'सर्वात सभ्य व्यक्ती' म्हणून उल्लेख केलाय. राजकुमार हिरानी यांच्यावर २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'संजू' या सिनेमात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केलाय. या महिलेनं ३ नोव्हेंबर २०१८ रोजी हिरानी यांचे सहकारी आणि संजू सिनेमाचे सहनिर्माते विधु विनोद चोपडा यांना लिहिलेल्या एक ई-मेलमध्ये हे आरोप केलेत. राजकुमार हिरानी यांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. 

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर हिरानी यांचं समर्थन करताना हिरानी यांच्याबद्दल त्यांचं मत शेअर केलंय. मी १९६५ मध्ये सिनेउद्योगात आलो. इतक्या वर्षानंतर तुम्ही मला विचाराल की या इंडस्ट्रीमध्ये सर्वात सभ्य व्यक्ती कोण आहे? तर माझ्या डोक्यात जे पहिलं नाव येईल ते नाव राजकुमार हिरानी यांचं असेल. जी बी शॉ यांनी म्हटलंच आहे की जास्त चांगलं असणंही धोकादायक ठरू शकतं, असं जावेद अख्तर यांनी ट्विटरवर म्हटलंय. 

जावेद अख्तर यांचं ट्विट
जावेद अख्तर यांचं ट्विट

अख्तर यांच्या अगोदर अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शर्मन जोशी हेदेखील हिरानी यांच्या समर्थनासाठी समोर आले होते. 

अभिनेता शर्मन जोशी यानं दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना एक कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हटलं होतं. महिलेनं हिरानी यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना शर्मन म्हणाला, मी राजकुमार हिरानी यांच्यासोबत आहे. ते खूपच कर्तव्यनिष्ठ, चरित्रवान आणि एक सन्माननीय व्यक्ती आहेत. 

सिनेनिर्माते बोनी कपूर यांनदेखील हिरानी यांना आपला पाठिंबा देत ते एक खूप चांगले व्यक्ती असल्याचा निर्वाळा दिला होता.