Jiah Khan Suicide Case : अभिनेत्री जिया खान आत्महत्या (Jiah Khan) प्रकरणावर आज विशेष सीबीआय न्यायालयात (CBI Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. न्यायालयाने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपातून तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात कोर्टाने सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणात सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबई पोलीस (Mumbai Police) आधी या प्रकरणाचा तपास करत होते आणि त्यानंतर राबिया खान यांच्या याचिकेवर न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला होता.
या निर्णयानंतर अभिनेता सलमान खान (Salman Khan) चर्चेत आला आहे. जियाच्या आईने सुरुवातीपासून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटले होते. राबिया यांचा एक जुना व्हिडीओही समोर आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी माझे सलमानसोबत भांडण नाही पण किमान तिच्या मुलीच्या मृत्यूचे सत्य समोर येऊ द्या, असे म्हटले होते. जिया खान आत्महत्या प्रकरणात सलमान खान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप जियाची आई राबिया खानने केल्याचा दावा माध्यमांमधून करण्यात येत होता. सलमान खानने हिरो चित्रपटाद्वारे सूरज पांचोलीला बॉलिवुडमध्ये लॉन्च केले होते. सूरज पांचोलीचे वडील आदित्य पांचोलीचे सलमान सोबत चांगले संबंध असल्याचेही म्हटले जात होते. जिया खानच्या वाढदिवशीच बोलताना राबिया खान यांनी सलमान खानवर गंभीर आरोप लावल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते.
"जिया खान प्रकरणात एका तपास अधिकाऱ्याने मला फोन करुन पुरावा सापडल्याचे म्हणत लंडनवरुन बोलवून घेतले होते. जेव्हा मी भारतात पोहोचले तेव्हा मला तपास अधिकाऱ्याने सांगितले की सलमान खानचा मला रोज फोन येतो आणि सूरज पांचोलीकडे चौकशी करु नका आणि त्याला सोडून द्या, असे सांगितले जाते. सलमान खान आपल्या ताकदीने या प्रकरणात हस्तक्षेत करत आहे," असा आरोप राबिया खान यांनी केल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता.
"माझं सलमान खानसोबत भांडण नाही. मी तर त्याला भेटलेही नाही. माझी मुलगी जिया वॉन्टेड चित्रपटादरम्यान भेटली होती. पण नंतर तिची बदली करण्यात आली. पण आता मी ऐकत आहे की, त्याचा आणि आणखी लोकांचा सुशांत सिंहसारख्या प्रकरणात सहभाग आहे. मला हे सहन झालं नाही. ही हत्या आहे की नाही हे तपासण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे गेले होते. त्यावेळी मला सीबीआयच्या अधिकाऱ्याने मला सांगितले की, मला वारंवार फोन येतात. या मुलाला लॉन्च केले जात असून त्याच्यावर पैसे लावण्यात आले आहेत त्यामुळे त्याची चौकशी करु नका यासाठी दबाव आणला जात आहे. आता तुम्हीच मला सांगा बीइंग ह्यूमनच्या नात्याने कमीतकमी सत्य तरी बाहेर यायला हवं. तू त्याला वकीलही देत आहे, प्रमोटही करत आहे. आई होण्याच्या नात्याने माझ्या मुलीच्या प्रकरणात सत्य बाहेर येऊ द्या," असेही राबिया खान एका व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.