मुंबई : पिळदार शरीरयष्टी आणि प्रभावी व्यक्तीमत्त्व या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'रॉ- रोमिओ अकबर वॉल्टर', या आगामी चित्रपटातून जॉनचं एक नवं आणि तितकंच चौकटीहबाहेरचं रुप पाहता येणार आहे. पाकिस्तानात पाठवण्यात आलेल्या एका भारतीय हेराची व्यक्तीरेखा तो साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये जॉन अवघ्या अडीच मिनिटांपेक्षाही कमी वेळात अशी काही अफलातून कामगिरी करुन जातो, की क्या बात अशीच दाद द्यावीशी वाटते.
भारत- पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीला सुरु असणारा वाद आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'रॉ...'च्या ट्रेलरची कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही चर्चा सुरु आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या नात्यावर चित्रपटाचं कथानक आधारलेलं आहे, त्यातीच झलक ट्रेलरमधून पाहता येते.
एक हेर म्हणून पातिस्तानात वावरत असताना एक प्रकारच्या भीतीच्या छायेखालीच सतत राहावं लागतं याचे भाव साकारताना हेर म्हणजे शौर्याचं एक प्रतिक ही भावनाही जॉनने सुरेखपणे मांडली आहे. मुलगा, हेर, देशभक्त, आपल्या कामाशी प्रामाणिक व्यक्ती असे विविध पैलू असणारी व्यक्तीरेखा साकारणारा जॉन पुन्हा एकदा गाजणार असंच म्हणावं लागेल.
रॉबी ग्रेवाल लिखित आणि दिग्दर्शित 'रॉ....' हा चित्रपट हा काही सत्य घटनांचा आधार घेत साकारण्यात आला आहे. यामध्ये जॉन मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्याच्यासोबतच सुचित्रा कृष्णमूर्ती, मौनी रॉय आणि सिकंदर खेर हे कलाकारही झळकणार आहेत. ५ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.