नवी दिल्ली : दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुमारास जाहीर होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांच्या नावांची यादी ही यंदाच्या वर्षी काहीशी उशिराने जाहीर करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडूनच याविषयीची माहिती देण्यात आली. सध्याच्या घडीला आगामी लोकसभा निवडणुकांचा माहोल आणि लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावं जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात. या समितीममध्ये नावाजलेले चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाविश्वाती काही चेहऱ्यांचा समावेश असतो, अशी माहितीही मंत्रालयाद्वारे देण्यात आली. या पुरस्कारांमध्ये चित्रपटांना प्रोत्साहित करणाऱ्या राज्याचाही सन्मान करण्यात येतो. पण, सध्याच्या घडीला सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आचारसंहिता पाहता परिणामी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा ही निव़डणुकांनंतर होणार आहे.
निवडणुकांमध्ये सर्व पक्षांना आणि उमेदवारांना समान संधी मिळणे अपेक्षित असते. अशा वेळी पुरस्कार जाहीर झाल्यास आचारसंहितेचा भंग होणार असल्याची शक्यता वर्तवत पुरस्कारांची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता थेट निवडणुकांनंतरच या कलेचा सरकार दरबारी सन्मान होणार आहे.
चित्रपट कलेमध्ये वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि चित्रपटांना नवी दिल्ली येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात शासनाकडून गौरवण्यात येतं. यामध्ये लघुपटांपासून विविधभाषी चित्रपटांचा आणि तितक्याच होतकरु कलाकारांचाही समावेश असतो. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी या पुरस्कारांसाठी कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.