Akshaya Hindalkar Mumbai Local Experience : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अक्षया हिंदळकरला ओळखले जाते. सध्या ती 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत अक्षया ही वसुंधरा रानडे हे पात्र साकारत आहे. या मालिकेमुळे अक्षया ही घराघरात लोकप्रिय झाली. आता अक्षयाने तिच्यासोबत मुंबई लोकलमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
अक्षया हिंदळकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता अक्षयाने मुंबई लोकलमधून प्रवास करतानाचा एक अनुभव सांगितला आहे. नुकतंच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मुंबई लोकल आणि प्रवास याबद्दल सांगितले आहे.
मला या मुलाखतीदरम्यान एक किस्सा सांगायचा आहे. माझी खूप वर्षापासून झी मराठीवर काम करण्याची इच्छा होती आणि आता अखेर ते जुळून आलं. मी याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण झी मराठीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. झी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे, या मालिकेचा पहिला प्रोमो आला आणि लोक मला ओळखायला लागले. मी नवी मुंबईत राहते. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मी लोकलने प्रवास करते. एकदा अशीच मी प्रवास करत होते, त्यावेळी मी काहीतरी खाण्यासाठी तोंडावरुन मास्क काढला. त्यावेळी माझ्यासमोर ज्या बायका होत्या, त्या सर्वांनी मला ओळखलं. माझ्यासाठी तो क्षण खूप भारी होता. त्यावेळी त्या सर्व महिलांनी मालिकेच्या प्रोमोचे कौतुक केले. त्यांनी मला पुन्हा कर्तव्य आहे, या मालिकेच्या प्रोमोमध्ये तुम्हीच आहात ना, असेही विचारले आणि फोटोही काढले.
मी आतापर्यंत इतकं काम केले आहे. पण कोणीही आतापर्यंत मला अशी ओळख मिळवून दिलेली नाही. पण झी मराठी या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने मला चांगली ओळख मिळवून दिली. जेव्हा प्रेक्षकांकडून अशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, तेव्हा काम करण्याची उर्जा अजूनच वाढते, असा किस्सा अक्षया हिंदळकरने सांगितला.
दरम्यान मराठमोळी अभिनेत्री अक्षया हिंदळकरने अनेक नाटकामंध्ये काम केले आहे. तिने ‘साता जन्माच्या गाठी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. कलर्स मराठीवरील 'सरस्वती' या मालिकेमध्येही ती झळकली. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. यात तिने ‘स्वाती’ हे पात्र साकारले होते. सध्या अक्षया 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत वसुंधरा रानडे हे पात्र साकारत आहे.