Megha ghadge emotional post : मी आलो... मी पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं... मराठी चित्रपटातील ही ओळ कोणा एका अभिनेत्याला फिट बसत असेल तर तो लक्ष्मीकांत बेर्डे... म्हणजेच आपला सर्वांचा लाडका लक्ष्या. मराठी चित्रपटसृष्टीचा खरा हिरा... ज्यांच्या अभिनयाने आपण सर्व लहाणाचे मोठे झालो, तो लक्ष्या आता आपल्यात नाही. मराठी सिनेसृष्टीतील ‘हास्यसम्राट’ अशी त्याची ओळख अजरामर राहिल हे नक्की. लक्ष्याने अनेकांना बालपण दिलं, तर अनेकांच्या दुख:ची जखम भरून काढण्याचं काम लक्ष्याने उभ्या आयुष्यात केलं. आज सिनेसृष्टी लक्ष्याचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच आता अनेकांनी पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे हिने देखील पोस्ट लिहित लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात, अशा आशयाखाली मेघा घाडगेने इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
आज लक्ष्या मामांचा बर्थडे! खरंतर आजही, जवळजवळ १९ वर्षानंतर वाटत राहतं, अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील, "महेशला (महेश कोठारे) कॉल कर आत्ताच्या आत्ता.." माझ्या आयुष्यातला पहिला रिलिज्ड सिनेमा आणि 'द लक्ष्मीकांत बेर्डे' यांचा शेवटचा रिलिज्ड सिनेमा एकच असणं याचं शल्य काय असू शकतं, याची कल्पना कुणालाही असण्याची शक्यता नाही. लहानपणी ज्यांचं कॉमेडी टायमिंग पाहून मी मोठे झाले, ज्यांचं इम्प्रोव्हायजेशन आजही अचाट करणारे वाटतात आणि मुळात ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला खळखळून हसवलं त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा, कलेच्या प्रांगणातला एक समृद्ध अनुभव होता.
हॅप्पी बर्थडे लक्ष्या मामा! We all miss you... तुमच्या अजरामर कामांतून, कलाकृतींमधून, अफाट परफॉर्मन्स मधून तुम्ही आजही आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात Alive आहात, असं मेघा घाडगेने म्हटलंय.
दरम्यान, ‘गडबड गोंधळ’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘दे दणादण’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘मज्जाच मज्जा’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘फेकाफेकी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘भुताचा भाऊ’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘धडाकेबाज’, असं अफलातून चित्रपटांनी लक्ष्याने सर्वांची मनं जिंकून घेतली. चित्रपट असो वा नाटक, लक्ष्याने प्रेक्षकांना कधीही निराश केलं नाही. आजच्या पिढीला लक्ष्मीकांत बेर्डे नावाचं जादू पहायला मिळाली नाही. याची खंत नेहमी राहिल.