Santosh Deshmukh Murder MCOCA: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. दरम्यान वाल्मिक कराड हत्येतील आरोपी नसल्याने त्याच्याविरोधात मोक्का लावण्यात आलेला नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची माहिती आमच्यासह संपूर्ण राज्याला द्यायला हवी अशी विनंती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सरकारकडे केली आहे. "माझे वडील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन एक महिना झाला. या प्रकरणात पोलीस त्यांचा तपास करत आहेत, परंतु त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही. या प्रकरणात नेमकं चाललय काय तपास कुठपर्यंत आलाय हे देशमुख कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवं ही माझी विनंती आहे.. या गुन्ह्यातील तपासाबाबत वेळोवेळी आम्हाला माहिती द्यावी," अशी विनंती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने केली आहे.
दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संभाजीराजे मनोज जरांगे सहभागी झाले आहेत.
दरम्यान आरोपी विष्णू साठे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडी काय पुढे करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुरवणी जबाबानुसार खुनाच्या खटल्यामध्ये सीआयडी पुन्हा ताब्यात घेणार का याकडे लक्ष आहे.