कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या 18 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू; दिल्ली रेल्वे स्थानकात काय घडलं? वाचा INSIDE STORY

New Delhi Railway Station Stampede Reason: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 प्रवासी ठार झाले आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 16, 2025, 06:55 AM IST
कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या 18 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू; दिल्ली रेल्वे स्थानकात काय घडलं? वाचा INSIDE STORY title=
18 Dead In New Delhi Railway Station Stampede Amid Maha Kumbh Train Rush

New Delhi Railway Station Stampede Reason: नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जात होते. या दुर्घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले असून त्याना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्र्यांनीही दुखः व्यक्त केलं आहे. 

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी 2 स्पेशल ट्रेन चालवल्या जात होत्या. शनिवारीनंतर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो लोक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते. नवी दिल्ली स्थानकातही खूप गर्दी झाली होती. मात्र, आधीपासून तिकिट बुक असल्याने प्रवाशांनी जनरल कोचचे तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्म नंबर 14-15 नंबरवर उभे होते. तिथूनच प्रयागराजला जाणारी ट्रेन येणार होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि भुबनेश्वर एक्स्प्रेस ट्रेन उशीराने धावत होती. ज्यामुळं त्याचे प्रवाशीदेखील प्लॅटफॉर्म नंबर 12-13 वर ट्रेनची वाट पाहत थांबले होते. त्यामुळं प्लॅटफॉर्मपासून ते जिन्यांपर्यंत प्रवाशांची गर्दी जमली होती. रात्री साधारण नऊ वाजण्याच्या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 15वर आली होती. ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली. याच धावपळीत पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले. 

चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली होती. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, पायऱ्यांवर प्रवाशांचे कपडे, बुटं-चप्पल दिसत आहे. अनेक व्हिडिओत लोक बेशुद्धावस्थेत पडले असल्याचे दिसत आहे. 

प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, मी त्यावेळी पायऱ्यांजवळच उभा होतो. मात्र अचानक तिथे चेंगराचेंगरी झाली. ट्रेन पकडण्याच्या धावपळीत लोक अक्षरशा एकमेकांवर पाय देऊन जात होते. दुर्घटना होण्याच्या शक्यतेने मी लगेचच तिथून बाजूला झालो. लोक एकमेकांवर पाय देऊन ट्रेन पकडण्यासाठी जात होते. या धावपळीत अनेक लोक खाली पडले आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये प्राण गमावलेल्या लोकांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला. ज्यामध्ये ते म्हणाले, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत माझे विचार आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो." ते म्हणाले की अधिकारी या परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांना मदत करत आहेत. पीएम मोदींशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.