मुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली असतनाच देवीच्या विविध रुपांची उपासना करण्यात येत आहे. सर्वत्र पाहायला मिळणाऱ्या या उत्साही वातावरणात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडिच सर्वांनाच एका वास्तवाशी सामना करायला भाग पाडत आहे.
दैनंदिन जीवनात आपल्या सुखावह जीवशैलीला प्राधान्य देत मुष्याकडून नानाविध मार्गांनी निसर्गावर घाला घातला जातो. अनेकदा तर याच निसर्गाच्या नियमांची पायमल्ली केली जाते. एकिकडे सारी सृष्टी म्हणजे कोणा एका दैवी शक्तीची देणगी आहे, असं म्हणत वरदानरुपी सृष्टीची पूजा करणारे तुम्ही आम्ही सर्वजण दुसरीकडे मात्र याच सृष्टीच्या विनाशाचं कारण ठरत आहोत.
अजाणते किंवा जाणतेपणेही अन्याय करत आहोत. याचंच दाहक वास्त तेजस्विनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या अशा रुपांमध्ये दिसणाऱ्या तेजस्विनीने तिसऱ्या दिवशी 'जरीमरी आई' या रुपातील फोटो शेअर केला आहे.
समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एका खडकावर मत्स्यरुपात बसलेल्या या जरीमरी आईला प्लास्टिकचा विळखा दिसत आहे. तिच्या आजुबाजूला गणेशमूर्तींचे अवशेष दिसत आहेत. बऱ्याच मानवी कृतींमुळे अनेकदा देवालाही हतबल व्हावं लागतं तेव्हा उद्विग्नतेने 'वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून...', असंच ती दैवी शक्तीही म्हणत असणार हे या फोटोचं कॅप्शन वाचून लक्षात येत आहे.
'माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं. ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत. पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिकच्या पिशव्या , अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर', असं म्हणत पुढे तिने एक असा प्रश्न मांडला आहे ज्यावर सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.