मुंबई : "मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हींग इमेजेस" म्हणजेच मामि या प्रतिष्ठित फिल्म फेस्टीवलला नुकतीच सुरुवात झाली आहे. मुंबईतील प्रमुख चित्रपटगृहांमधे शुक्रवार २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मामि चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या चित्रपटांमध्ये जिओ स्टुडिओजचे चक्क ३ मराठी चित्रपट सामील झाले आहेत.
यामध्ये पहिला चित्रपट म्हणजे, समिक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेला
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ''उनाड" या चित्रपटाचा समावेश आहे. यात तीन मित्रांची म्हणजेच शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते) आणि जमील (चिन्मय जाधव) आणि स्वराली (हेमल इंगळे) यांच्या मैत्रीची गोष्ट आहे .
दुसऱ्या चित्रपटाबद्दल सांगायचे म्हणजे, यावर्षीचे बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॅार्ड मोडणारा, आजपर्यंतचा दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट माधुरी भोसले निर्मीत आणि केदार शिंदे दिग्दर्शीत "बाईपण भारी देवा" आहे. मामि निमित्त रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या अभिनेत्रींची धमाल पुन्हा एकदा मोठया पडद्यावर बघायला मिळणार आहे.
तिसरा चित्रपट म्हणजे वरुण नार्वेकर दिग्दर्शीत "एक दोन तीन चार" हा नवाकोरा चित्रपट आहे. या चित्रपटातून निपुण धर्माधिकारी यांचं प्रमुख भूमिकेत पदार्पण होत असून त्यांच्या सोबत वैदेही परशुराम ही मुख्य भूमिकेत आहे. वैद्यकीय जगातला एक चमत्कार अतिशय सुंदर पद्धतीने मांडत, विनोदाची अचूक पेरणी करत, आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टुडिओजतर्फे मनोरंजनाची ही ट्रीट नक्कीच खास ठरणार आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी उनाड, आणि एक दोन तीन चार यांचे screening असून ३ नोव्हेंबरला बाईपण भारी देवाचा विशेष खेळ असणार आहे.