मुंबई : मनरेगा कार्डच्या बाबतीत झालेला आणखी एक मोठा घोटाळा सध्या समोर येत आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेशातील झिरनिया पंचायतीच्या पिपरखेडा नाका या खेड्यातील सरपंच, सचिव आणि रोजगार सहायक यांनी रोजगार कार्डांमध्ये घोळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
इथं रोजगार कार्डांवर पुरुषांच्या नावापुढं चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा फोटो लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे फक्त दीपिकाच नव्हे तर, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिंस आणि अशा आणखीही कलाकारांचे खोटे फोटो लावून रोजगार कार्ड तयार केली गेली. ज्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी मजुरांच्या नावावर पैसे उकळल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.
हा सर्व प्रकार तेव्हा समोर आला, ज्यावेळी लाभार्थींनी मनरेगाच्या वेबसाईटवर कामाचा मोबदला न मिळण्याबाबत सर्च केलं. त्यावेळी त्यांची रोजगार कार्ड ही बनावट असल्याचा खळबळजनक खुलासा झाला. या मजुरांच्या नावांपुढं अभिनेत्रींचा फोटो लावत रोजगार कार्ड बनवली गेली आणि त्या माध्यमातून पैसेही काढले गेले असा खुलासा यावेळी झाला. कामगारांनी काम केल्याचा दावा करत हे पैसे काढण्यात आले. पण, प्रत्यक्षात मात्र कामगारांनी हे काम केलेलंच नाही.
'झी न्यूज'च्या वृत्तानुसार, मोनी दुबे यांच्या माहितीनुसार त्यांच्या कार्डावर दीपिका पदुकोण हिचा फोटो लावत त्या कार्डातून तीस हजार रुपये काढण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हा प्रकार दर महिन्याला सुरु आहे. तर, सोनूच्या नावापुढं जॅकलिन फर्नांडिसचा फोटो लावत बनावट कार्डाद्वारे रक्कम काढली गेली आहे.
पंचायत क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांच्या, मजुरांच्या म्हणण्यानुसार त्यांना असं कोणत्याही प्रकारचं काम मिळालेलं नाही. सरपंच, सचिव, रोजगार सहायक यांच्यापासून अगदी मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचा या भ्रष्टाचारात सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठिकाणी तर, यंत्रांच्या माध्यमातून काम करुन घेत हा घोटाळा करण्यात आला आहे. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर बनावट कार्ड कशी बनवली गेली आणि या माध्यमातून किती रक्कम काढली गेली अशा दोन मार्गांनी तपास केला जाणार आहे.