Amitabh Bachchan Ad : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) पुढील आठवड्यात बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) सुरू होणार आहे. याची सेलची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. या सेलसाठी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्या एका जाहिरातीमुळे अभिताभ बच्चन अडचणीत सापडले आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) बच्चन यांच्या विरोधात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे (CCPA) तक्रार केली आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने फ्लिपकार्ट, अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध दिशाभूल करणार्या जाहिरातीबद्दल तक्रार दाखल केली आहे. नवी दिल्ली येथे व्यापार्यांच्या संघटनेने आगामी बिग बिलियन डेज निमित्त बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्या फ्लिपकार्टच्या जाहिरातीविरोधात ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता अभिताभ बच्चन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने अमिताभ बच्चन यांच्यावर फ्लिपकार्टच्या जाहिरातीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरही अनेक यूजर्स या जाहिरातीवर टीका करत आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल सुरू होणार आहे. यामुळे कंपनीच्या अनेक जाहिराती व्हायरल होत आहेत. कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन यांची एक जाहिरातही सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ज्यात ते कंपनीच्या ऑफर्सबद्दल सांगताना दिसत आहेत. पण त्यांनी सांगितलेल्या एका ओळीमुळे दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. 'ये दुकान पर नहीं मिलने वाला...' असे बिग बींनी जाहिरातीत म्हटले आहे. यावर आता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
We @CAITIndia & @AimraIndia express deep regret to watch @SrBachchan participating in a misleading advertisement casting unwarranted reflections on capabilities of traders of the Country. We strongly demand for immediate withdrawal of the said advertisement else we will be forced… pic.twitter.com/ZvF0fYVO89
— Praveen Khandelwal (@praveendel) September 29, 2023
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ही जाहिरात व्यापाऱ्यांच्या विरोधात असल्याचे म्हटलं आहे. यासोबतच ही जाहिरात मागे घेण्याची मागणी केली आहे. बच्चन यांनी दुकानदारांना दुय्यम असल्याचे दाखवलं आहे. तसेच जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार करणाऱ्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी फ्लिपकार्टला शिक्षा आणि बिग बींना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टने या प्रकरणी पाठवलेल्या मेलला प्रतिसाद दिला नाही. तर अमिताभ यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र आता फ्लिपकार्टने ही जाहिरात युट्यूबवरून प्राईव्हेट केली असल्याचे सांगितले जात आहे.