मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपीका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य भूमिकेत असलेल्या पठाण सिनेमा (Pathan Film Controversy) वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सिनेमातील एका गाण्यात दीपीकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. या बिकीनीच्या रंगावरुन चांगलंच राजकारण तापलंय. भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे या सिनेमावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही पठाण सिनेमाचा विरोध दर्शवला. या विरोधावरुन मराठी अभिनेता निर्माता पुष्कर श्रोत्रीने (Pushkar Kshotri) राम कदम (Ram Kadam) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. रंगावर धर्माचा हक्क कधीपासून आला, रंगाचा आणि धर्माचा संबंध काय, असा सवालही श्रोत्री यांनी विचारला. (pathan film deepika padukone bikini colour controversy marathi actor pushkar shotri angry on bjp mla ram kadam over to demandes boycott)
"कोरोनानंतर प्रेक्षक सिनेमागृहात येत नाहीयेत. माझ्यासारखे कलाकार यामुळे धास्तावलेत. मी छोटा कलाकार, निर्माता-दिग्दर्शक म्हणून धास्तावलोय की प्रेक्षकांना थेटरमध्ये आणण्यासाठी काय करायला हवं. प्रेक्षकांना पुन्हा सिनेमागृहात यावं आणि आधीप्रमाणे सिनेमाचा आनंद घ्यावा. याचा मी विचार करतोय. मात्र यादरम्यान शुल्लक गोष्टीसाठी कपड्यांचा रंग हा असाव की तो असावा हा प्रश्न किती किरकोळ आहे. दीपीकाने त्या गाण्यात विविध रंगाचे, सोनेरी, सप्तरंगी, हिरवा आणि निळ्या रंगाचे कपडे घातलेत. रंगावर प्रत्येक पक्षाचं आणि धर्माचं असा हक्क असू शकत नाही. रंग प्रत्येकाचा असतो. पांढरा, हिरवा, निळा प्रत्येक रंग माझा आहे. या रंगांनी मला वेळोवेळी आनंद आणि अनुभव दिलाय. त्यामुळे हा रंग माझा आणि तो रंग माझा नाही, असं म्हणूच शकत नाही", असं श्रोत्रीने नमूद केलं.
"दीपीकाने इतक्या वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातले. मात्र त्यात 10 सेंकंदासाठी दिसणाऱ्या ज्याला तुम्ही भगवा, केशरी, ऑरेन्ज म्हणू शकता. फक्त शब्दछळ केला म्हणून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या हे चुकीचं आहे", असं श्रोत्रीने नमूद केलं.
तुम्ही सर्वांनी आम्हाला लोकांना थेटरमध्ये आणण्यासाठी मदत करायला हवी. राम कदम तुम्हीच काय विविध पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. पण यापुढेही करायला हवं, जेणेकरुन लोकं परत येतील. सिनेमा थेटरमध्ये येऊन पाहायचा असतो. त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन, मदत, प्रेम आणि पाठिंबा हे तुमच्याकडूनच मिळायला हवं. मात्र बॉयकॉट ही पद्धत फार चुकीची आहे. आम्ही फार धास्तावलो आहोत. आमचे पैसे सिनेमात पणाला लागलेले असतात. निर्माते आपलं घर गहाण ठेवून सिनेमासाठी पैसा उभा करतात. एका सिनेमासाठी 100-20 हात लागलेले असतात. त्यामुळे तुम्ही फक्त एका रंगामुळे तुम्ही बॉयकॉट टाकून सिनेमा पाहू नका असं म्हणंन एकदम चुकीचं आहे. त्यामुळे मी चिंताग्रस्त झालोय. या देशात असं कधी होईल, असं वाटलं नव्हतं", अशी खंतही यावेळेस श्रोतीने व्यक्त केली.