मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्याच केली असल्याचा खुलासा झाला. आता पोलिसांनी सुशांतच्या बँक डिटेल्सबाबत, त्याशिवाय त्याच्या लग्नाबाबतही अधिक माहिती समोर आली आहे.
सुशांतने आत्महत्येचं टोकाचं पाऊल आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कर्ज असल्यामुळे, पैशाची चणचण भासत असल्यामुळे तर उचललं नाही ना, यासाठी त्याच्या बँक डिटेल्सचा तपास करण्यात आला. परंतु त्यात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. बँक स्टेटमेंटमध्ये कोणतंही मोठं नुकसान झाल्याचं आढळून आलेलं नाही.
त्याशिवाय, सुशांतने त्याच्या वडिलांशी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला असताना, नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं तो बोलला असल्याची माहिती मिळत आहे. सुशांतच्या जवळच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलीशी तो लग्न करणार होता, त्यांच्या नात्यात काही बाबी ठिक नसल्याचं सांगण्यात आलं.
सुशांत रविवारी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृत्यूबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या पार्थिवावर आज दुपारी 3च्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे वडील, काही कुटुंबिय पटणाहून मुंबईत पोहचले आहेत.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचा मृतदेहावर मुंबईच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्याच्या आत्महत्येच्या कारणांविषयी अनेक उलटसूलट चर्चा सुरु आहेत. सुशांतच्या आत्महत्येची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचं एक पथक त्याच्या घरी दाखल झालं होतं. यावेळी पोलिसांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.