मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक आणि देशातीच एकंदर राजकीय हवा पाहता प्रत्येक पक्षाने प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. पंतप्रधानांपासून विरोधा पक्ष नेत्यांपर्यंत प्रत्येकाने मतदारांची भेट घेण्याचं सत्रही सुरू केलं आहे. या साऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि पर्यायी भाजपचा वेगळ्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. 'नमो टीव्ही' या वाहिनीवरून सर्वतोपरिंनी नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचाच प्रचार सुरू असून, आता विरोधकांनी या विरोधात आवाज उठवला आहे.
'नमो टीव्ही'च्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून माहिती आणि प्रसारण खात्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता सुरु असताना त्याच काळात 'नमो टीव्ही' ही वाहिनी झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. याशिवाय दूरदर्शनवर 'मै भी चौकीदार' या कार्यक्रमाचं १ तास २४ मिनिटं प्रसारणही का करण्यात आलं, अशी विचारणाही दूरदर्शनला करण्यात आली.
आचारसंहिता सुरू असताना सरकारच्या परवानगीशिवाय 'नमो टीव्ही'चं प्रसारण होऊच कसं शकतं, हा एक प्रकारे आचारसंहितेचा भंगच आहे असा मुद्दा विरोधकांनी उचलून धराला आहे. 'नमो टीव्ही'वर संपूर्ण दीवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, प्रचारसभा, भाषणं याचं थेट प्रक्षेपण आणि पुन:प्रक्षेपण दाखवण्यात येतं. शिवाय अनेक पंतप्रधान योजनांच्या जाहीरातीसुद्धा या वाहिनीवर दाखवण्यात येतात. इतकच नव्हे, तर या वाहिनीवर जे चित्रपट दाखवण्यात येतात तेही एक प्रकारे स्वच्छ भारत योजना किंवा अशा इतर योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपच्या कार्याच्या आलेखाकडे लक्ष वेधतील. त्यामुळे 'नमो टीव्ही'च्या माध्यमातून एका अर्थी भाजप आणि मोदी थेट देशवासियांच्या घराघरात पोहोचले आहेत हे खरं. प्रचाराची ही पद्धत मात्र विरोधकांना न रुचल्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे याविषयीची केले होती.