मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. ५४ व्या वर्षी श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवींनी बॉलीवूडच नाही तर दक्षिण भारतातही अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट असलेल्या बाहुबलीमध्ये अभिनय करण्याची संधी श्रीदेवींपुढे होती. यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांनी श्रीदेवींना शिवगामची भूमिका ऑफर केली होती.
शिवगामीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीनं ८ कोटी रुपये मागतिले होते. एवढच नाही तर हैदराबादला प्रत्येक वेळी शूटिंगला जाण्यासाठी पाच बिझनेस क्लासची तिकीटं, हैदराबादमधील सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये पाच बिझनेस सुट्स आणि बाहुबलीच्या हिंदी आवृत्तीत तिनं शेअरही मागितला होता, असा गौप्यस्फोट राजमौली यांनी केला होता.
राजमौली यांच्या या गौप्यस्फोटानंतर श्रीदेवीही चांगल्याच भडकल्या होत्या. कलाकारानं केलेल्या मागण्या सार्वजनिक करण्याचा अधिकार कोणत्याही दिग्दर्शकाला नसल्याचं श्रीदेवी म्हणाल्या होत्या. अशाप्रकारे व्यायसायिक गुप्त गोष्टी उघड करणं चुकीचं आहे. याआधीही माझ्या मागण्या मान्य न झाल्यामुळे मी चित्रपट नाकारले आणि ते हिट झाले, अशी प्रतिक्रिया श्रीदेवींनी दिली होती.