मुंबई : विद्या बालनच्या 'डर्टी पिक्चर' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता आणखी एक अभिनेत्री असंच काही करणार आहे.
अभिनेत्री ऋचा चड्डा 1990 च्या दशकातील प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री शकिलाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शकिला केरळची राहणारी आहे आणि तिने तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील अनेक अडल्ट सिनेमांमध्ये काम केलं आहे. बायोपिकमध्ये शकिलाच्या 16 वर्षापासूनच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. विद्या बालनने 'डर्टी पिक्चर' या सिनेमामध्ये सिल्क स्मिताची भूमिका केली होती. तसंच आता ऋचा चड्डा शकिलाची भूमिका करणार आहे.
न्यूज एजेंसी आयएएनएसनुसार ऋचाचे प्रवक्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, 'हा सिनेमा 1990 च्या दशकातील मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री शकिलाच्या जीवनावर आधारित आहे. तिचे संपूर्ण आशियामध्ये चाहते आहेत. एक महिला कलाकाराच्या रुपात तिने खूप प्रसिद्धी मिळवली. त्या काळी जी सोपी गोष्ट नव्हती. चायनीज, नेपाली आणि इतर भाषांमध्ये देखील शकिलाचे सिनेमे डब होत होते.
सिनेमाची शूटींग एप्रिल किंवा मेमध्ये सुरु होईल. इंद्रजीत लंकेश या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. इंद्रजीत लंकेश हे पत्रकार गौरी लंकेश यांचा भाऊ आहे. गौरी लंकेश यांची मागच्या वर्षी हत्या झाली होती.