Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी 2024 हे वर्ष खूप वाईट गेले आहे. कारण अभिनेत्याला गेल्या वर्षी अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आणि तसे प्रयत्नही झाले. सलमान खानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकी याचीही हत्या झाली होती. या सर्व परिस्थितीमध्ये सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या घराची सुरक्षा देखील कडक करण्यात आली आहे. हे सर्व बदल ईदच्या आधी होत आहेत.
अभिनेता सलमान खान हा दरवर्षी ईद आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या बाल्कनीत त्याच्या चाहत्यांना भेट देत असतो त्या बाल्कनीमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी अभिनेत्याच्या घरात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याची बाल्कनी बुलेटप्रूफ करण्यात आली आहे.
सलमान खानच्या बाल्कनीत मोठा बदल
सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच सोशल मीडियावर सलमान खानच्या घराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर असणाऱ्या बाल्कनीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या बाल्कनीत काचेच्या मोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. या खिडक्यांची खासियत म्हणजे त्या बुलेटप्रूफ आहेत. जेणेकरून कोणीही गोळीबार केला तरी गोळी आतमध्ये येऊ नये. आता यंदाच्या ईदच्या दिवशी सलमान खान येथूनच त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे.
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धकम्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून येत होत्या. यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. सलमानच्या घराबाहेर नेहमीच कडक सुरक्षा असते. महाराष्ट्र सरकारकडून अभिनेत्याला Y+ सुरक्षा मिळाली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी अभिनेता आणि त्याच्या कुटुंबियांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यासोबतच सलमान खानने बाल्कनीमध्ये येऊ नये असे देखील सांगण्यात आले होते. घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याचे सांगण्यात येत आहे.