Happy Birthday Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर 9 जूनला 37 वर्षांची झाली आहे. या आनंददायी क्षणासाठी सोनमचा पती, तिचे कुटुंबिय, मित्र आणि बॉलिवूडमधील तिच्या सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरही बर्थडे गर्ल सोनम कपूरची चर्चा सुरु आहे. सोनम कपूर आपल्या चित्रपटांपेक्षा स्टाईल स्टेटमेंट आणि लॅव्हिश लाइफ स्टाईलसाठी चर्चेत असते. तसेच ती आपले विचार स्पष्टपणे मांडण्यासाठीही ओळखली जाते. याआधी ती तिच्या बेताल वक्तव्यामुळेही चर्चेत आली होती. सोनम कपूरच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही किस्से सांगणार आहोत. बेताल वक्तव्यामुळे तिने ऐश्वर्या राय आणि कतरीना कैफ यांना दुखावलं होतं.
एका प्रसिद्ध कॉस्मेटिक ब्राँडसाठी ऐश्वर्याला रिप्लेस करत सोनम कपूरला संधी देण्यात आली होती. यावेळी तिने केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. "ऐश्वर्या दुसऱ्या पिढीची आंटी आहे", असं वादग्रस्त वक्तव्य तिने केलं होतं. मात्र त्यानंतर तिने सारवासारव करत वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचं सांगितलं होतं.
एवढंच नाही तर सोनमने कतरिना कैफलाही निशाण्यावर घेतले आहे. एका मुलाखतीत सोनमने कतरिना कैफला 'निर्लज्ज' म्हटले होते. तिनं सांगितलं होतं की, 'ती हे कसं करते हे मला माहीत नाही. काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची बांधिलकी आणि विशिष्ट प्रकारचा निर्लज्जपणा आवश्यक आहे. तुम्हाला स्टारडमसह ते मिळू शकतं. तुमच्या टॅलेंटवरील आत्मविश्वासाने किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही कोण असू शकता. अशा प्रकारचे चित्रपट करण्यापूर्वी मला तसं विकसित करण्याची गरज आहे."